

Chhatrapati Sambhajinagar Vaijapur Municipality Garbage Issue
वैजापूर : शहर स्वच्छ, नीटनेटके आणि कचरा-मुक्त ठेवण्यासाठी वैजापूर नगरपालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेल्या मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभर स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे.
नगरपालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागांतील कचऱ्याचे ढिगारे हटविण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, काही नागरिक अजूनही नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. गंगापूर रोडवरील ओपन स्पेसवर मोठ्या प्रमाणात कचरा आढळून आला. तपासात हा कचरा याच परिसरातील ‘अजित कलेक्शन’ या दुकानातून टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्याधिकारी बिघोत यांनी तत्काळ कारवाई करत पथकासह हा कचरा पुन्हा संबंधित दुकानात नेऊन ठेवला आणि दुकानावर १,००० रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा रंगली असून, स्वच्छतेबाबत गांभीर्य वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक ठिकाणी अजूनही उघड्यावर कचरा टाकण्याच्या घटना सुरूच असल्याने प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारचा नियमभंग केल्यास दंडाची रक्कम वाढविण्यात येईल आणि वारंवार उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सातत्याने ही मोहीम राबवली गेल्यास, शहरातील कचऱ्याचे ढिगारे कमी होऊन स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.