

Corruption in Yashwant Student Scheme in Chhatrapati Sambhajinagar district
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी श्रीमंत राजे यशवंतराव होळकर विद्यार्थी विकास योजना सुरू केली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी असून, गरजू विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण देण्यासोबतच वसतिगृहाचीही सुविधा दिली जाते. या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी दरवर्षी सुमारे ७० हजार रुपये खर्च केला जातो.
या योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा प्रकार समोर आला आहे. अनेक ठिकाणी ना विद्यार्थी आहेत, ना वसतिगृहे, तरीही अनुदानाची रक्कम उचलण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा घोटाळा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या जिल्ह्यातच उघडकीस आला आहे.
या संदर्भात बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले, ज्या शाळांमध्ये सुविधा द्यायला पाहिजे, त्या देत नसतील तर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू आणि त्यांची मान्यता रद्द करू. ज्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात योग्य आणि वेळेवर रिपोर्टिंग दिले नाही तर अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सावे यांनी दिला आहे.