

वैजापूर : शेत नांगरताना ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.४) दुपारी दोनच्या दरम्यान तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कापूसवाडगाव येथे घडली. अमोल अशोक गिरी (वय ३५) असे या घटनेतील मृताचे नाव असून या घटनेमुळे कापूसवाडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अमोल गिरी हे आपल्या कुटुंबासह कापूसवाडगाव शिवारातील गिरी वस्तीवर शेतवस्तीवर राहतात. बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान ते आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरत होते. त्यावेळी शिवारातील कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने ते ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. तसेच वीरगाव पोलिसांना संपर्क करून त्यांना माहिती दिली. त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. विहिर जवळपास ७० फुल खोल असल्याने व त्यात जास्त पाणी असल्याने पाणी काढून त्यानंतर क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला . व त्यानंतर कापूसवाडगावचे पोलीस पाटील गणेश कदम व सचिन निगळ यांनी नागरिकांच्या मदतीने अमोल यांचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढला. दरम्यान, या प्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.