MP Accident |
मध्य प्रदेश : लग्न सोहळ्यातून घरी परतताना सिमेंटने भरलेला ट्रक कारवर उलटल्याने ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी आहेत. मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री हा अपघात झाला.
थंडला-मेघनगर दरम्यान संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळील वळणावर ट्रक आणि कारची धडक झाली. मृतांपैकी ८ जण थंडलाजवळील शिवगड महुदा येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे, तर आणखी एक मृत शिवगडजवळील गावातील असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताची चौकशी सुरू आहे. मेघनगर येथे मंगळवारी रात्री राजस्थानहून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक इको व्हॅनवर उलटला. या अपघातात इको व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या नऊ जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारमधून लोकांना बाहेर काढले. तपासणीनंतर डॉक्टरांनी नऊ जणांना मृत घोषित केले, तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
झाबुआचे पोलिस अधीक्षक पद्मविलोचन शुक्ला या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी सांगितले की, रात्री २ वाजताच्या सुमारास मेघनगर तहसील हद्दीतील संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळील रस्त्यावरून ट्रक बांधकाम सुरू असलेला रेल्वे ओव्हर ब्रिज ओलांडत होता. तेव्हा त्याचा तोल गेला आणि तो एका कारवर उलटला. ट्रक सिमेंटने भरलेला होता. कारमधील प्रवासी एकाच कुटुंबातील असून लग्न समारंभातून परतत होते.