

छत्रपती संभाजीनगर : नशेखोरांच्या टोळक्याने भवानीनगर चौकात खासगी बसवर दगडफेक करत समोरील काच फोडली. ही घटना गुरुवारी (दि.९) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
पुंडलिकनगर रस्त्यावरील जयभवानीनगर चौकातून बस (एमएच २० इल ०९७५) कंपनीतील कामगारांना घेऊन जात असताना अचानक टोळक्याने दगड मारला. जबर वेगाने लागलेल्या दगडामुळे बसची समोरची संपूर्ण काच फुटली. काच फुटून रस्त्यावर पडल्यानंतर नशेखोर हुल्लडबाजी करत घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले. घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील म्हस्के पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पुंडलिकनगर व जय भवानी चौक परिसरात नशेखोरांचा वावर वाढला असून नागरिकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांचा धाक नसल्याने नशेखोरांची हिम्मत वाढली आहे.