Ahilyanagar Tension:
अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरात रस्त्यावर रांगोळी काढून आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. हा मजकूर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवणारा आणि त्यांचा अवमान करणारा असल्याची तक्रार करण्यात आली. यावरून दोन गटात झालेल्या तणावाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात दुर्गादौडचे आयोजन करण्यात आले होते. माळीवाडा भागातून जाणाऱ्या या दौडच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती. ही रांगोळी आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत जमाव जमला. त्या जमावाने आक्रमक होत कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतर दोन्ही गटांचे जमाव पोलीस ठाण्यात आल्याने तणावाची परिस्थिती अधिक वाढली.
या सर्व घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण होण्यामागील 'षडयंत्राचा' शोध घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.