

Shiv Sena Vilas Bhumre Driver Investigation
छत्रपती संभाजीनगर: हैद्राबादमधील सालारजंग कुटुंबातील वंशजांपैकी एकाकडून 'हिबानामा' म्हणजे गिफ्टडीड मध्ये संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे रेडीरेकनर दरानुसार कोट्यवधी किमतींची तीन एकरची जमीन मिळाल्याबद्दल शिवसेनेचे खासदार आणि माजी मंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे आमदार पुत्र विलास यांचा चालक असलेल्या जावेद शेख रसूल याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी परभणीतील एका वकिलाने तक्रार दाखल केली आहे.
ड्रायव्हर जावेद रसूल शेख असे या चालकाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चालकाला चौकशीसाठी बोलावले आहे. त्याच्या आयकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर गिफ्ट डीड कोणत्या आधारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे, हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे..
सालार जंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिबानामाची चौकशी करत आहे. सालार जंग कुटुंब हे एक प्रमुख कुलीन कुटुंब होते, ज्यांचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते.
हा संपूर्ण प्रकरण परभणी येथील वकील मुजाहिद इक्बाल खान यांच्या तक्रारीनंतर समोर आले आहे. खान यांनी केलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे हैदराबाद येथील सालारजंगचे वंशज मीर महमूद आली खान यांच्याकडे जमिनीचा दावा लढण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी संभाजीनगरमधील तीन एकर जमीन देणार असे ठरले होते. त्या अनुषंगाने वकील खान यांनी सालारजंग वंशज मीर यांना 90 लाख ते 1 कोटी रुपये दिले, शिवाय भूमिअभिलेख कार्यालयात दावा जिंकून देऊन त्या जागेच्या पी आर कार्डवर मीर महमूद व त्यांच्या परिवाराचे नाव देखील लावले.
मात्र, त्याच दरम्यान मीर महमूद आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी ती जमीन मोठी रक्कम घेऊन आमदार विलास भुमरे यांचा चालक जावेद शेख रसूल याच्या नावे हीबानामा लिहून दिला. ही बाब माहिती झाल्यावर संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांना भेटून सविस्तर माहिती दिली. मात्र, भुमरे यांनी धमकी दिली, व मंत्रिपदाचा दबाव वापरुन त्याच्या चालकाच्या नावे जमिनीचा हिबानामा करून घेतला, कोट्यावधी रुपयांची जमीन खरेदी करून सरकारची स्टॅम्प ड्युटी बुडविली, कुठलाही इन्कम सोर्स नसल्याने चालकाने कोट्यवधीची जमीन कशी घेतली ? असे अॅड. खान यांच्या तक्रारीत नमूद आहे.
माजी मंत्री खासदार संदिपान भुमरे आणि त्यांच्या मुलाने संगमत करून जमीन लाटल्याचा आरोप तक्रारदार अॅड. मुजाहिद खान यांनी केला आहे.आपल्याला मारहाण करण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे.आता भूमरे यांच्या चालकाला चौकशीसाठी बोलावले आहे. हा जमीन लाटण्याचा डाव आहे. असा आरोप खान यांनी केला.
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहेत. चालक जावेद शेख रसूल याची आयकर रिटर्न च्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्त्रोत, आणि कोणत्या आजारावर गिफ्ट डिड स्वाक्षरी करण्यात आली, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणाशी आमचा कुठलाही संबंध नाही, जावेद हा आमचा चालक आहे. तो सकाळी येतो, कामकरून संध्याकाळी जातो. त्याच्या व्यवहाराबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही.
- आमदार विलास भुमरे