

Kudal School Supplies Order
कुडाळ : काही शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून पालक व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ठराविक विक्रेत्यांकडून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांवर अशी सक्ती करू नये, असे काही प्रकार आढळल्यास संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रक छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहे. याप्रमाणे इतर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांतूनही अशाच स्वरूपाचे स्पष्ट आदेश तातडीने काढावेत, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत समितीने प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सोमवार 16 जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. दरम्यान काही खाजगी शिणि संस्थांच्या शाळा व्यवस्थापन समित्या स्टेशनरी, युनीफार्म, शू आदी साहित्य ठरावीक दुकानातून खरेदी करण्याची सक्ती पालक व विद्यार्थ्यांना करतात. हे योग्य नाही. अश्या प्रकारावर दंडात्मक कारवाईचा इशारा देणारे पत्रक छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहे.
असे प्रकार सर्वच जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांकडून कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने सर्वच जिल्हा प्रशासनांनी असे आदेश पत्रक काढणे आवश्यक आहे. तसेच पालकांच्या माहितीसाठी संबंधित आदेश शाळेच्या फलकावर लावण्याच्या सूचना सर्व शाळांना द्याव्यात, पालकांवर कोणत्याही वस्तूंची खरेदी ठराविक विक्रेत्याकडून करण्याची सक्ती केल्याचे आढळल्यास संबंधित शाळेविरुद्ध तात्काळ दंडात्मक कारवाई करावी, त्याची माहिती संबंधित शाळेच्या तसेच शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशा तक्रारींसाठी शिक्षण विभागाने विशेष हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा, त्या संदर्भात प्रत्येक शाळेच्या फलकावर स्पष्ट माहिती असलेले पत्रक लावण्याचे निर्देश द्यावेत, अशा विविध मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.