PWD Recruitment Scam: आता सार्वजनिक बांधकाम विभागात भरती घोटाळा; 10 वर्षात चतुर्थश्रेणीची तब्बल 31 पदे बोगस भरली

Chhatrapati Sambhajinagar News | समितीच्या चौकशीनंतर भांडाफोड; दोन लिपिकांविरुद्ध गुन्हा दाखल
PWD Recruitment Scam Maharashtra
PWD Recruitment Scam MaharashtraPudhari
Published on
Updated on

PWD Class IV Recruitment Scam In Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन लिपिकांनी दहा वर्षात अनुकंपा, लाडपागे समितीच्या शिफारशी आणि सरळ सेवेतून तब्बल ३१ जणांना मोठ्या रकमा घेऊन बोगस नियुक्तीपत्रे देऊन मोठा भरती घोटाळा केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार २०१५ ते २०२५ या काळात घडला. कार्यकारी अभियंत्याची बोगस स्वाक्षरीचे पत्र काढून छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर येथील विभागात नियुक्त्या देखील देण्यात आल्या. मात्र, सहा जणांच्या समितीने चौकशी केल्यानंतर याचा भांडाफोड झाला.

वरिष्ठ लिपिक अंकुश श्रीरंग हिवाळे (रा. काल्डा कॉर्नर) आणि कनिष्ठ लिपिक उज्वला अनिल नरवडे- गायकवाड (बडतर्फ) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती वेदांत नगर ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी बुधवारी (दि.२३) दिली.

फिर्यादी शेषराव काशिनाथ चव्हाण (वय ५५) हे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून नोकरीला आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, वरिष्ठ लिपिक अंकुश हिवाळे आणि कनिष्ठ लिपिक उज्वला नरवडे यांनी शासनाचे कोणतेही आदेश नसताना किंवा भरतीची जाहिरात नसताना २०१४ ते २०२५ या काळात सावर्जनिक बांधकाम विभाग/राष्ट्रीय महामार्ग विभाग, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, लातूर विभागात रिक्त असलेल्या जागांपैकी अनुकंपावर १२, लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार १६ व सरळ सेवेने ३ अशा २१ महिला व पुरुषांना शिपाई, चौकीदार, सफाई कामगार या पदांवर नियुक्ती पत्रे देऊन विविध जिल्ह्यात नियुक्त केले.

PWD Recruitment Scam Maharashtra
Yashwant Student Scheme : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यशवंत विद्यार्थी योजनेत भ्रष्टाचार

बनावट नियुक्ती आदेश तयार करताना कार्यकारी अभियंता यांची बनावट स्वाक्षरी वापरली. दरम्यान, हे पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कार्यकारी अभियंता अशोक वामनराव येरेवार यांनी १५ मे २०२५ रोजी उप कार्यकारी अभियानात एस.बी. बिऱ्हारे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली होती. त्यात आरोपी अंकुश हिवाळे आणि उज्वला नरवडे या दोघांनी मोठा आर्थिक व्यवहार करून ३१ जणांना बोगस नियुक्त्या देऊन भरती घोटाळा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वेदांत नगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२२) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रविणा यादव, उपनिरीक्षक संतोष जोशी करत आहेत.

भरती प्रक्रियेच्या फाईल गायब

चौकशी समितीने दोन्ही आरोपी लिपिकांना ३१ जणांच्या नस्ती तपासणी करिता हजर करण्याचे आदेश दिले. तेव्हा त्यांनी हजर केले नाही. त्यामुळे त्यांच्या कपाटाचे कुलूप तोडून तपासणी केली तेव्हा भरती प्रक्रियेचे व इतर कागदपत्रांच्या फाईल गायब असल्याचे आढळून आले.

माय-बाप सेवेत नसताना अनुकंपावर नोकरी

आई-वडील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत नसताना त्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली होती. यामध्ये चंद्रकांत दत्तू घोडके (चौकीदार, रा.मा. वि. नांदेड), रोहित कुसुमाकर गरबडे, ओंकार प्रभाकर आवारे, प्रथमेश अप्पासाहेब टकले (सर्व शिपाई, रा. मा. वि. नांदेड), सागर दिगंबर शेजूळ, राहुल बाबुराव जाधव, रवींद्र अशोकराव शिंदे, नितीन रामचंद्र अंभोरे, अमोल किसन वाघमारे, शिवकुमार कचरू बोर्डे (सर्व शिपाई, रा. मा. वि. लातूर), सुरेश दिलीप मोरे (शिपाई, रा. मा. वि. छत्रपती संभाजीनगर), सुबोध अंकुश हिवाळे (स. चि. पूल विभाग, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

PWD Recruitment Scam Maharashtra
मराठवाड्यात सहा नव्या वनस्पतींची नोंद, छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यात उगवण

नातेवाईक सेवानिवृत्त अथवा मृत नसताना नियुक्ती

कोणतेही नातेवाईक सार्वजनिक बांधकाम विभागात सेवानिवृत्त किंवा मृत झालेले नसताना लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार बनावट नियुक्त्या देण्यात आल्या. यामध्ये प्रतिका रमेश जायभाये, योगेश चंद्रभान ढेपले, गायत्री नारायण बोर्डे, रवींद्र शेषराव शेजूळ (सर्व शिपाई, रा. मा. वि. नांदेड), विशाल राजकुमार, शुभम आर सोदी, अजय रकुमार रिदलान (सर्व सफाई कामगार, सा.बां. छत्रपती संभाजीनगर), महेंद्र शेषराव शेजूळ (शिपाई, रा. मा. वि. लातूर), चंद्रशेखर रविकांत दाभाडे (सफाई कामगार, सा. बा. छत्रपती संभाजीनगर), विश्वदीप सुरेश सूर्यवंशी, सुभाष वाल्मिक आरके (दोघे शिपाई, रा. मा. वि. लातूर), सुबोध अंकुश हिवाळे (शिपाई, रा. मा. वि. जालना) संतोष नारायण गायकवाड (सफाई कामगार (सा. बां. जालना), अंकुश उत्तम ब्रह्माराक्षस (सफाई कामगार, उ.मु. वास्तू शास्त्रज्ञ, छ. संभाजीनगर), डी. आर. बनसोडे (सफाई कामगार, रा. मा. वि. जालना) आकाश रविकांत शेळके (सफाई कामगार, सा. बा. छ. संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

आरोपी उज्वला नरवडेचीही नियुक्ती सरळ सेवेतून

सरळ सेवेचे आदेश नसताना श्रद्धा नारायण बोर्डे आणि आरोपी उज्वला नारायण नरवडे- गायकवाड (शिपाई, सा. बां. छत्रपती संभाजीनगर) तसेच श्रीकांत विठ्ठल हिवाळे (चौकीदार) यांना बनावट आदेशावर नोकरी देण्यात आल्याचे समोर आले. या ३१ जणांनी चौकशी समितीसमोर नियुक्तीस पात्र नसल्याचे कबूल केले. या सर्वांचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news