

Kannad Jamdi Ghat former Sarpanch son murder
कन्नड : तालुक्यातील जामडी (घाट) येथे माजी सरपंचाच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. १३) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. राजू रामचंद्र पवार (वय ४५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजू पवार यांचे कुटुंब गेल्या पंधरा वर्षांपासून गावातील राजकारणात सक्रिय आहे. राजू पवार यांचे वडील रामचंद्र पवार हे पाच वर्षांपूर्वी गावाचे सरपंच होते. सध्या त्यांच्या काकू रेणुका कैलास पवार या विद्यमान सरपंच आहेत.
राजू पवार हे आपल्या वडिलांचे तसेच विद्यमान सरपंच असलेल्या काकूंचे बहुतांश शासकीय कामकाज बघत होते. या पार्श्वभूमीवर ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज चर्चेतून व्यक्त केला जात आहे.
राजू पवार हे सकाळी शेतात चकर मारायला गेले ते लवकर परत न आल्याने त्यांना घरच्या नी फोनवरून संपर्क केला मात्र त्यांनी फोन न घेतल्याने घरच्यानी शेतात जावून बघितले असता मृतदेह आढळून आल्याने घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास पोलीस करीत असून अद्याप या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.