

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे शहराच्या विकासकामांसाठी कर्ज घेणारी महापालिका दुसरीकडे नागरिकांच्या पैशावर अधिकाऱ्यांचे परदेशात अभ्यास दौरे आयोजित करत असल्याचे समोर आले आहे. तिजोरीवर तब्बल १६०० कोटी रुपयांच्या कर्जाचे ओझे असलेल्या मनपाचे चार वरिष्ठ अधिकारी १६ ते २३ मे यादरम्यान स्वित्झरलॅन्ड आणि फ्रान्स येथे दौऱ्यावर जाणार आहेत. या अभ्यास दौऱ्याला प्रशासनाने मंजुरी दिली असून, यावर सुमारे ४० लाख रुपये खर्च होणार आहेत. या दौऱ्याला सुरुवात होण्यापूवीच वादात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिकेने डिझास्टर मॅनेजमेंट तथा स्मार्ट सिटी कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम अंतर्गत भूकंप अभियांत्रिकी आणि सुनामी डिझास्टर मॅनेजमेंटच्या अभ्यासासाठी स्विझरलॅन्ड आणि फ्रान्स येथे दौर्याचे आयोजन केले आहे. यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे, उपायुक्त अंकुश पांढरे, कार्यकारी अभियंता रस्ते बाळासाहेब शिरसाट, नगररचनाकार कौस्तुभभावे यांचा या दौऱ्यात समावेश आहे. या दौऱ्याला प्रशासनाने अलीकडेच मंजुरी दिली आहे. या दौऱ्यावर सुमारे ४० लाखांहून अधिकचा खर्च होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, महापालिकेवर अगोदरच १६०० कोटींचे कर्ज आहे. यासह दोन ते तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम देण्यासाठी मनपाच्या लेखा विभागाकडे निधी नसल्याने ८४ कोटींहून अधिकची रक्कम थकीत आहे. त्याचप्रमाणे कंत्राटदारांची २८४ कोटीपर्यंत देणी थकली आहेत. याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांमध्ये स्वहिस्सा भरण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत अभ्यास दौरा आयोजित करण्यात आल्याने लोकप्रतिनिधींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरासाठी या दौऱ्याचा काय उपयोग?
स्वित्झरलॅन्ड आणि फ्रान्स येथे आयोजित या अभ्यास दौऱ्याच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शहरात भूकंप किंवा सुनामीसारख्या आपत्तींचा धोका अत्यल्प असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे अशा विषयांवरील अभ्यासाचा थेट उपयोग कितपत होणार, याबाबत साशंकता वर्तवण्यात येत आहे. तसेच स्थानिक परिस्थिती पहाता परदे-शातील आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान लागू होण्याची शक्यता कमी असल्याचे मतही जाणकारांनी मांडले आहे.
यापूवीचे दौरे ठरले निष्फळ
यापूवीही कचरा व्यवस्थापनासारख्या विषयांवर अधिकाऱ्यांनी इंदूरसह विविध शहरांचे दौरे केले होते. मात्र त्यातून प्रत्यक्षात शहराच्या समस्या सोडवण्यात काय उपयोग झाला हे अद्याप समोर आ-लेले नसून, अनेक अहवाल कागदोपत्रीच राहिल्याची टीका होत आहे.
राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
महापालिकेची आर्थकि परिस्थिती पहाता हा निर्णय योग्य की अयोग्य, यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, नागरिकांच्या मूलभूत समस्या प्रलंबित असताना विदेश दौऱ्यावर खर्च करण्यास विरोधकांनी विरोध दर्शविला आहे.
शासनाच्या कार्यक्रमांतर्गत दौरा
या संदर्भात उपसंचालक मनोज गर्जे यांनी सांगितले की, हा दौरा शासनाच्या कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्यानंतर सविस्तर अहवाल सादर करून भविष्यातील उपाययोजनांसाठी दिशा ठरवली जाणार आहे. शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी अशा अभ्यास दौऱ्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.