Budget 2026 | आव्हाने आणि संधीचा समतोल

Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanFile Photo
Published on
Updated on

डॉ. विजय ककडे

केंद्रीय अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणांपेक्षा व्यावहारिक सुधारणा, संरचनात्मक बदल आणि भविष्यात भारताला अपरिहार्य अर्थशक्ती बनवण्याचा आशावाद दिसून येतो.

केंद्रीय अर्थसंकल्पातून सरकारची वित्तीय तूट कमी करण्यात यश येत असून केवळ स्वावलंबन पुरेसे नाही, तर भविष्यकाळात अपरिहार्य ठरेल अशा रचनेकडे देशाला नेण्याचा आशावाद यातून व्यक्त केला आहे. आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात जीएसटी दर सुधारणा उत्पन्न कर नवी रचना लागू करणे, श्रमसंहिता प्रारंभ करणे, या सर्वातून व्यवसाय सुलभता निकष वाढला आहे. देशाची क्षमता सेवा क्षेत्रात अधिक असल्याने या अंदाजपत्रकाने भारत जागतिक सेवा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, म्हणून एकूण जागतिक सेवा निर्यातीच्या दहा टक्के वाटा भारताचा करण्याचा संकल्प यामध्ये आहे.

भारताच्या विकासाचा पाया हा वाहतूक दळणवळण तसेच संचार सुविधा असल्याने यावर्षी 12 लाख कोटी तरतूद केली आहे. 20 राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्यात येणार असून सागरी मालवाहतूक तसेच पुणे-हैदराबाद यासारखे मालवाहतूक मार्ग फेट कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत. पाच लाखांपर्यंत लोकवस्ती असणाऱ्या शहरांचा विकास हा आता विकास प्रक्रिया विस्तृत करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न करतो. उत्पादनामध्ये हायटेक कंटेनर उत्पादन करणे हा याचाच एक भाग ठरतो. बायो फार्मा म्हणजेच जैव औषधे आणि भारतीय ज्ञानसंपदेवर आधारित पारंपरिक आयुर्वेद आणि इतर औषधे यांचा वापर करत आरोग्यदायी जीवनमान सर्वांना उपलब्ध होईल, यावर अर्थसंकल्प लक्ष देतो. आरोग्य पर्यटनासाठी पाच विशेष केंद्रे स्थापन करणे तसेच योग आणि आयुर्वेदिक औषधांच्या विकासाकरिता तीन नव्या अखिल भारतीय संस्थांची स्थापना करणे व सध्या कार्यरत असणाऱ्यांच्या दर्जामध्ये वाढ करणे यातून भारतात पर्यटन आणि आरोग्य यांची सांगड घातली जाणार आहे. मनोरंजनाची नवी अर्थव्यवस्था ऑरेंज इकॉनॉमी विकसित होत असून या ठिकाणी कौशल्य वैविध्यता आणि नावीन्य महत्त्वाचे असते. मुंबई येथे प्रशिक्षण केंद्र व कंटेन्ट विकसित करण्यासाठी मार्गदर्शन देणाऱ्या 20 लाख व्यावसायिकांना संधी मिळणार आहे. पाच टाऊनशिप विद्यापीठे स्थापन करणे हा एकात्मिक शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी एक वसतीगृह स्थापन केले जाणार आहे. ग््राामीण भागातील स्त्रियांसाठी तिचे दुकान ‌‘शी मार्ट‌’ अशी योजना जाहीर केली आहे.

लघू उद्योगांना प्रोत्साहित केल्यास आपोआप रोजगारही निर्माण होत असतो. यासाठी लघू उद्योगांना भांडवल सहभागासाठी दहा हजार कोटींची तरतूद केली असून त्यांना वित्तपुरवठा केला जाणार आहे. जागतिक क्रीडा साहित्य पुरवठा केंद्र हे लघू उद्योगांच्या मार्फतच विकसित होणार आहे. कापड उद्योग हा महत्त्वाचा रोजगारक्षम उद्योग असून नैसर्गिक, कृत्रिम व औद्योगिक कापड यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. मेगा टेक्स्टाईल पार्क हा याचाच एक भाग आहे. दुर्मीळ खनिज संपत्ती ही व्यापारी युद्धाची बाब असून भारतात केरळ, ओडिशा राज्यांत अशी दुर्मीळ साधन संपत्ती विकसित करण्यास महत्त्व दिले जाणार आहे.

भारताला भविष्यकाळात वेगवान अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थकारणात एक महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात दिसतो. अर्थसंकल्पाच्या मांडणीनंतर भांडवल बाजाराने नकारात्मक प्रतिक्रिया दिली याचे महत्त्वाचे कारण सट्टेबाजी व्यवहारावर करवाढ केल्याने त्याची प्रतिक्रिया दिसते. तथापि, फार मोठ्या सुधारणा आणि घोषणा यापेक्षा संकट आणि संधी तसेच उत्पन्न आणि खर्च यात समतोल साधण्याचा प्रयत्न हा अर्थसंकल्प करतो. एकूण आर्थिक निर्णय अंदाजपत्रकापेक्षा अन्य मार्गाने अमलात येत असल्याने अंदाजपत्रकाचे धोरणात्मक महत्त्व कमी होते. तथापि, अर्थव्यवस्थेची स्थिती आणि दिशा याची अधिकृत माहिती अंदाजपत्रकातून मिळत असते. अंदाजपत्रकाबाबत फार अपेक्षा ठेवणाऱ्यांचा भमनिरास होणे साहजिक आहे. अंदाजपत्रक व्यावहारिक निकषांवर चांगले ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news