

Chhatrapati Sambhajinagar Firing
गंगापुर : आज दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास गंगापुर शहरालगत गंगापुर छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या चहाच्या हॉटेलजवळ गोळीबाराची घटना घडली. एका सराईत गुन्हेगाराने एका व्यक्तीवर थेट गोळ्या झाडल्याने परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली.
प्राथमिक माहितीनुसार, जामगाव ता गंगापुर येथील रहिवासी आदिनाथ दिलीप जाधव वय २८ हा तरुण दुपारी १ : ३० वाजताच्यादरम्यान शहराबाहेर असलेल्या वाजे अमृततुल्य या हॉटेल जवळ चहा पिण्यासाठी गेला होता. यावेळी तो लघुशंकेसाठी हॉटेलच्या मागील मोकळ्या शेतात गेला असता त्याचेवर अज्ञात व्यक्तीने हल्ला चढवला आदिनाथने पळण्याचा प्रयत्न केले असता त्या व्यक्तीने त्याचेवर पिस्तुलातून गोळी झाडली. ती गोळी त्याच्या बरगडीला चाटून गेली दोघांची झटापट सुरू असताना समोरच्या व्यक्तीने आणखी दोन गोळ्या झाडल्या त्या आदिनाथ च्या मांडीला चाटून गेल्या. दरम्यान आदिनाथने त्याच्या ताब्यातील पिस्तुल हिसकावत तेथून मोटारसायकल वर पळ काढला. त्यानंतर थेट पोलीस ठाण्यात येत त्याने आपल्यावर गोळीबार झाल्याचे सांगितले त्यास पोलीसांनी तात्काळ गंगापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्याचेवर प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले.
सहाय्यक फौजदार दिनकर थोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. घटनास्थळी दोन जिवंत काडतुसे व खाली काडतुस सापडले असून गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे काम सुरू आहे गोळीबार करणारा आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची कुजबुज सुरु असून या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास सुरू असून, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.