

Vitthal-Rukhmini temple shops vacated 7 days, temple committee issues notices shopkeepers
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :
भाविकांच्या सुविधेकरिता पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचे उत्तर बाजूस असलेले १३ गाळे ७ दिवसांच्या आत खाली करा अशा नोटिसा मंदिर समितीच्या वतीने दुकानदारांना बजावण्यात आल्या आहेत.
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज महानगरातील छोट्या पंढरपुरात दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरत असते. येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या उत्तर बाजूस मंदिराचे १३ गाळे असून अनेक वर्षांपासून ते व्यावसायिकांना भाडे तत्त्वावर देण्यात आले आहेत.
आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेता भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच त्यांना सुरळीत दर्शन घेता यावे याकरिता सदरील गाळे खाली करण्याचा निर्णय मंदिर समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. या विषयी संबंधितांना दोन दिवसांपूर्वी नोटिसा देऊन थकीत भाडे जमा करून ७ दिवसांच्या आत गाळे खाली करा नसता कार्यवाही करून गाळे ताब्यात घेऊ असे सूचित करण्यात आले आहे.
आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात मंगळवारी (दि. १७) पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला वरिष्ठ पोलिस अधिकारी, विठ्ठल- रुख्मिणी मंदिर विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, एमआयडीसी, सिडको, महावितरण, आरोग्य तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.