Sangita Tai Maharaj Death Case: वैजापुरात महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, आश्रमातील घटनेने खळबळ
वैजापूर : वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील मोहटादेवी आश्रमात एका महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ह.भ.प. संगीताताई महाराज असे हत्या झालेल्या कीर्तनकाराचे नाव आहे. ऐन आषाढी वारीच्या काळात ही घटना घडल्याने वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही घटना शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.
या हत्येचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू असून, मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, वैजापूर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

