

छत्रपती संभाजीनगर : शहरातील उद्योजक आणि व्यावसायिक आता सायबर भामट्यांच्या रडारवर आले आहेत. बांधकाम कंपनीच्या मालकाचा मोबाईल नंबर हॅक करून किंवा 'स्पूफिंग' द्वारे थेट त्यांच्याच नंबरवरून मॅनेजरला व्हॉट्सअॅप मेसेज करत तब्बल ५० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना गुरुवारी (दि.३ सप्टेंबर) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास सिडको टाऊन हॉल भागात उघडकीस आली. सायबर गुन्हेगारांनी हे ५० लाख रुपये नवी दिल्लीतील बँक खात्यात वळते केले. त्यानंतर भामट्यांनी आणखी ३६ लाख रुपयांची मागणी केल्याने या फसवणुकीचा भांडाफोड झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भरूका कन्स्ट्रक्शन प्रा. लि. चे मालक राजेश कमलनयन भरूका (५९, रा. एन-१, सिडको) यांच्या तक्रारीनुसार, अक्षयदीप प्लाझा, टाऊन सेंटर, सिडको येथे त्यांच्या कंपनीचे ऑफिस आहे. ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कंपनीचे मॅनेजर अशोक परसराम सपाटे यांच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. हा मेसेज थेट मालक राजेश भरूका यांच्या नंबरवरून आल्याचे दिसत होते.
या मेसेजमध्ये थॉटेक इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या नवी दिल्ली (ओखला) येथील बँक ऑफ इंडियाच्या खात्यात ५० लाख रुपये ट्रान्सफर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. साहेबांचाच (मालकाचा) आदेश असल्याने मॅनेजर अशोक सपाटे यांनी कोणताही संशय न घेता, सिडको येथील अॅक्सिस बँकेच्या खात्यातून आरटीजीएस'द्वारे ५० लाख रुपये त्या खात्यावर तात्काळ पाठवले.
बँकेत धाव, पण तोपर्यंत रक्कम गायब
आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भरूका यांनी तातडीने ३६ लाखांचे पेमेंट थांबवण्यास सांगितले आणि थेट सिडकोतील अॅक्सिस बँकेत धाव घेतली. बँकेत जाऊन खात्री केली असता, पाठवलेले ५० लाख रुपये दिल्लीच्या खात्यात जमा होऊन, तेथून पुढे वेगवेगळ्या बँक खात्यांवर ट्रान्सफर झाल्याचे उघड झाले. यानंतर भरूका यांनी तात्काळ शहर सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शेषराव खटाणे करत आहेत.
दोन उद्योजकांसोबत असाच प्रकार
भरूका कन्स्ट्रक्शनच्या मालकाला ५० लाख रुपयांचा गंडा घातल्याने शहरातील उद्योजकांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्याभरात याच 'मोडस ऑपरेंडी'चा (हॅकिंग ट्रेंड) वापर करून शहरातील दोन मोठ्या कंपन्यांना टार्गेट करण्यात आले होते. मालकाचा मोबाईल किंवा व्हॉट्सअॅप हॅक करायचा, किंवा मालकाचा फोटो (डीपी) लावून मॅनेजरला बनावट नंबरवरून मेसेज करायचा आणि मालकच आदेश देत असल्याचे भासवून कोट्यवधी रुपये अन्य बँक खात्यात ट्रान्सफर करून घ्यायचे, ही सायबर गुन्हेगारांची नवी पद्धत बनली आहे.
यापूर्वी ऑगस्ट आणि जुलै महिन्यात अशाच प्रकारे दोन कंपन्यांना गंडा घालण्यात आला होता. (त्यातील १ कोटीची रक्कम सायबर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत गोठवली होती). मात्र, सायबर भामट्यांकडे शहरातील उद्योजकांचा, त्यांच्या बँक खात्यांचा आणि मॅनेजर/अकाऊंटंटच्या मोबाईल नंबरचा एवढा अचूक डेटा कुठून येतोय? हा अत्यंत गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे.
३६ लाखांच्या मागणीने फुटले बिंग
पहिली ५० लाखांची भलीमोठी रक्कम जमा झाल्यानंतर भामट्यांची हिंमत वाढली. त्यांनी त्याच खात्यात आणखी ३६ लाख रुपये पाठवण्याचा मेसेज पुन्हा मॅनेजरला केला. मात्र, एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यास वेळ लागत होता. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मालक राजेश भरूका हे वाळूज एमआयडीसीतील साईटवरून परत येत असताना, मॅनेजर सपाटे यांनी त्यांना फोन केला. तुम्ही सांगितलेले ५० लाख त्या कंपनीला पाठवले आहेत. आता पुन्हा ३६ लाख रुपये पाठवायला वेळ लागेल, समोरची पार्टी पेमेंटसाठी खूप गडबड करत आहे, असे सपाटे यांनी सांगताच भरूका यांना मोठा धक्का बसला. कारण, त्यांनी ५० लाख किंवा ३६ लाख रुपये पाठवण्याबाबत कोणताही मेसेज केलेलाच नव्हता.