

ठाणे : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने गणेशमूर्तींच्या खरेदीची लगबग सुरू झाली असतानाच यंदा बाप्पाच्या मूर्तींसाठी गणेशभक्तांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कच्चा माल, रंग, प्लास्टिक, पॅकिंग साहित्य, इंधन आणि वाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे गणेशमूर्तींच्या किमतीत सरासरी २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पेणमधील मूर्तीकारांनीही यंदा सुमारे २५ टक्के दरवाढ केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या खर्चात मूर्तीच्या वाढलेल्या किमतीचीही भर पडणार आहे.
गेल्या काही वर्षांत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींपेक्षा शाडू माती आणि कागदी लगद्यापासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे गणेशभक्तांचा कल वाढला आहे. विसर्जनानंतर होणारे जलप्रदूषण आणि पर्यावरणावरील परिणाम याबाबत वाढलेल्या जनजागृतीमुळे नागरिक मूर्तीचे साहित्य, रंग आणि विसर्जनाची पद्धत याबाबतही माहिती घेऊ लागले आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी वाढत असतानाच त्यांच्या किमतीवरही वाढत्या उत्पादन खर्चाचा परिणाम झाला आहे.
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, रंग, प्लास्टिक, पॅकिंग साहित्य आणि अन्य वस्तूंच्या किमतीत यंदा मोठी वाढ झाली आहे. रंगांचे साहित्य २५ ते ३० टक्क्यांनी महागले असून, मूर्ती झाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशवीचा दर १६० रुपयांवरून २२० रुपये किलो झाला आहे.
प्लास्टिक, पॅकिंग टेप आणि इतर साहित्याच्या दरवाढीमुळे मूर्ती तयार करण्याचा खर्च वाढला आहे. त्यात पेट्रोल, डिझेल आणि व्यावसायिक गॅसच्या किमती वाढल्याने कार्यशाळेतील तसेच मूर्तींच्या वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. याशिवाय मूर्ती साकारण्यासाठी लागणाऱ्या कारागिरांच्या मजुरीतही वाढ झाली असून, कच्चा माल, इंधन आणि मजुरी अशा सर्वच पातळ्यांवरील वाढीचा थेट परिणाम गणेशमूर्तींच्या अंतिम किमतीवर झाला आहे.
ठाण्यातील सिद्धिविनायक आर्टचे सुखमणी यांनी सांगितले की, यंदा त्यांच्या दुकानातील सुमारे ७० टक्के ग्राहक पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मागणी करत आहेत. मात्र, शाडू माती, कागदी लगदा, रंग आणि अन्य साहित्याच्या किमती वाढल्याने पर्यावरणपूरक मूर्तींच्या दरातही २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
पेणमधून देशभरात तसेच परदेशात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती पाठवल्या जातात. पेणमधील कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या लाखो मूर्तींच्या वाहतुकीचा खर्चही इंधन दरवाढीमुळे वाढला आहे. मूर्तींच्या पॅकिंगपासून वाहतुकीपर्यंतचा खर्च वाढल्याने त्याचा थेट परिणाम अंतिम किमतीवर झाला आहे. “रंग, प्लास्टिक, पॅकिंग साहित्य यासह इंधन आणि वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या दरात सुमारे २५ टक्के वाढ करावी लागली,” असे पेण येथील मूर्तीकार निलेश समेळ यांनी सांगितले.
कामगार खर्चासह वाहतुकीचाही भार
मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे रंग, प्लास्टिक व अन्य साहित्य २५ ते ३० टक्क्यांनी महागले.
प्लास्टिक पिशवीचा दर १६० रुपयांवरून २२० रुपये किलो.
कर्नाटक, राजस्थान, अहमदाबाद येथे वाहतुकीचा खर्च १० हजारांवरून १३ हजार रुपयांवर...
इंधन, व्यावसायिक गॅस आणि कामगारांच्या ये-जा खर्चातही वाढ.
वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे मूर्तींच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांची वाढ.