

The main water pipeline will be completed on August 31st, including testing.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुवठा योजनेच्या कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईला झालेल्या बैठकीत कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने कामासंबंधीची डेडलाईन दिली आहे. कंत्राटदाराने दिलेले वेळापत्रक लेखी स्वरूपात घेतल्यास यातून पळवाट शोधता येणार नाही, अशी विनंती सरकारी वकिलांनी बुधवारी (दि. ११) झालेल्या सुनावणीप्रसंगी उच्च न्यायालयाकडे केली. त्यावर न्या. रवींद्र घुगे आणि न्या. साठे यांच्या पीठाने पुढील सुनावणीप्रसंगी यावर विचार केला जाईल, असे स्पष्ट केले.
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, त्यावर प्रत्येक महिन्यात सुनावणी सुरू आहे. यात बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या सह्याद्री विश्रामगृहावर झालेल्या बैठकीचा वृत्तांत सादर केला.
तर कंत्राटदार कंपनीने कामे पूर्ण करण्याची मुदत निश्चित केली. त्यानुसार आता ३१ ऑगस्टपर्यंत कंत्राटदाराला मुख्य जलवाहिनीचे काम चाचणीसह पूर्ण करावे लागणार आहे.
जॅकवेलचा पहिला टप्पा ३० ऑगस्ट २५
३८.४५ किमी जलवाहिनी हायड्रोलिक टेस्ट, आरटीव्हीटी टेस्टसह पूर्ण करणे ३१ ऑगस्ट २५
नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण प्रकल्प पन्नास टक्के पूर्ण करणे - ३१ जुलै २५
जलशुद्धीकरण प्रकल्प ते शहर पाणीपुरवठा लाईन टाकणे ३१ ऑक्टोबर २५
उंच पाण्याच्या ३० टाक्या पूर्ण करणे - ३१ ऑक्टोबर २५
३० झोनसाठी पाणी वितरण व्यवस्था - ३१ ऑक्टोबर २५
जॅकवेलचे पूर्ण काम ३१ मार्च २०२६
जलशुद्धीकरण केंद्राचे शंभर टक्के काम ३१ डिसेंबर २५
वीस उंच पाण्याच्या टाक्या ३० सप्टेंबर २०२६
पाणी वितरण प्रकल्प उर्वरित ३१ डिसेंबर २०२६
पाणीपुरवठा योजनेचे उर्वरित काम ३१ डिसेंबर २०२६