

Chhatrapati Sambhajinagar Minister Sanjay Shirsata Political News
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या घोटाळ्यांचे आरोप होत आहेत. नवनवीन प्रकरणे बाहेर काढत विरोधी पक्ष शिवसेना उबाठा आणि एमआयएमने त्यांची चोहोबाजूंनी घेराबंदी करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मंत्री शिरसाट हे स्थानिक पातळीवर स्वः पक्षातही एकाकी पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात त्यांच्यासह शिवसेनेचे सहा आमदार आणि एक खासदार आहे, परंतु हे सर्व त्यांच्यापासून अंतर राखून असल्याचे दिसून येत आहे.
महिनाभरापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सुरुवातीला त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले, मात्र हे वादळ शमविण्यात शिरसाट यांना यश आले. तोच शहरातील वेदांत हॉटेलच्या खरेदीचा मुद्दा पुढे आला. प्रशासनाने राबविलेल्या लिलाव प्रक्रियेत शिरसाटांच्या मुलाने ही मालमत्ता ६४ कोटींत खरेदी केली.
मात्र ही मालमत्ता ११० कोटीची असून, शिरसाटांसाठी प्रशासनाने त्याची किंमत कमी दाख वून त्याचा लिलाव केल्याचा तसेच या लिलाव प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप शिव-सेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. यानंतर शिरसाट यांनी मुलगा सिद्धांत हा या लिलाव प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
त्यातच एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर दारू कंपनीसाठी शेंद्रा एमआयडीसीतील भूखंड चुकीच्या पद्धतीने खरेदी केल्याचा प्रकार समोर आणला. तसेच त्याची कागदपत्रेही उघड केली. यापाठोपाठ आता शिरसाट यांच्या त्र्यंबकेश्वर येथील जमीन खरेदीचा प्रकार समोर आला आहे. या सर्व कारणांमुळे शिरसाट यांची चोहोबाजूंनी घेराबंदी केली जात आहे.
विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात याच मुद्द्यावरून शिरसाट यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षांनी कागदपत्रांची जुळय- ाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे शिरसाटांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पालकमंत्री होताच शिरसाट यांनी शिवसेनेचेच आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध उघड मोहीम उघडली होती. त्यामुळे दोघांमध्ये जाहीर शाब्दिक युद्ध रंगले होते. काही दिवसांपूर्वी घाटीच्या अधिष्ठातांच्या बदलीवरूनही त्यांनी शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या भूमिकेलाही शह देण्याचा प्रयत्न केला. या सर्व कारणांमुळे शिवसे-नेतील स्थानिक आमदार आणि खासदार संदीपान भुमरे हेही शिरसाट यांच्यापासून अंतर राखून असल्याचे दिसत आहे. याशिवाय मित्रपक्ष भाजपकडूनही कोणताही आमदार किंवा पदाधिकारी आतापर्यंत शिरसाट यांच्या बाजूने उभा राहिलेला नाही,
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी मंत्री शिरसाट यांच्या लॅण्ड क्रुझर गाडीवरूनही मोठा गौप्यस्फोट केला. शिरसाट वापरत असलेली अडीच कोटी रुपयांची लॅण्ड क्रूझार गाडी ही दुबईतून मागविलेली असून, ती त्यांच्या पार्टनरच्या नावे असल्याचे जलील यांनी म्हटले आहे. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शिरसाट हे कोट्यवधींच्या मालमत्ता खरेदी करत आहेत. त्यांच्याकडे इतके पैसे आहेत, तर मग ते स्वतःच्या नावावर गाडी का खरेदी करत नाहीत, असा सवाल केला आहे. तसेच हा मनीलाँड्रींगचाच प्रकार असल्याचा आरोपही केला आहे.