

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या विविध उपाययोजनांना स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६ मध्ये चांगले यश मिळाले आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या या सर्वेक्षणात दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४८ शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरने १६ वा क्रमांक मिळविला. गतवर्षी शहर ३४ व्या क्रमांकावर होते. महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या शहर स्वच्छतेच्या प्रयत्नांना यश आले असून यंदाच्या परिक्षणात शहराला २०० पैकी १७८ गुण मिळाले.
शहरातील स्वच्छतेवर भर देत महापालिका प्रशासनाने हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी प्रमुख रस्ते, चौक, वाहतूक मार्ग आणि गर्दीच्या परिसरांची नियमित स्वच्छता, यांत्रिक पद्धतीने साफसफाई यावर भर दिला. यासोबतच कचऱ्याची बंदिस्त वाहनांतून वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर कचरा पडणे व दुर्गंधी कमी करण्यास मदत झाली. तसेच महापालिकेकडून रिफ्यूस ट्रान्सफर स्टेशन (आरटीएस) यंत्रणेचीही प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. यासह उघड्यावर कचरा जाळण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकांकडून नियमित पाहणी केली जात आहे.
यासोबतच कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई, ओला-सुका कचरा वेगळा करणे आणि नियमित संकलन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महापालिकेकडून ओला - सुका कचरा वर्गीकरण जनजागृती, प्रतिबंध, निरीक्षण आणि दंडात्मक कारवाई अशा चार पातळ्यांवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याशिवाय वाहतूक व प्रदूषण नियंत्रण, हरित क्षेत्र वाढविणे आणि पर्यावरणविषयक जनजागृतीलाही चालना देण्यात आली आहे.
या प्रयत्नांमुळे हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकात (एक्यूआय) सुधारणा झाल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वाखाली या उपाययोजनांना गती देण्यात आली.
दरम्यान, आयुक्त येडगे यांनी ही कामगिरी पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात उपाययोजना अधिक परिणामकारक करून नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर महापौर समीर राजूरकर यांनीही या कामगिरीचे स्वागत केले. नागरिकांचे सहकार्य, सहभाग आणि महापालिका प्रशासनाचे नियोजन यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी आणखी सरस कामगिरी करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कचरा व्यवस्थापनावर चौफेर भर
धूळ नियंत्रणासोबतच कचरा जाळण्यास प्रतिबंध, ओला-सुका कचरा विलगीकरण, नियमित संकलन, बंदिस्त वाहतूक, आरटीएस यंत्रणा आणि दंडात्मक कारवाई यावर महापालिकेने लक्ष केंद्रित केले. जनजागृती व नियमित निरीक्षणामुळे कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी झाले. वाहतूक प्रदूषण नियंत्रण आणि हरित क्षेत्रासाठीच्या उपाययोजनांमुळेही हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली.