

छत्रपती संभाजीनगर : शहराचे प्रवेशद्वार सुसज्ज करण्यासाठी महापालिकेने विकास आराखड्यातील मंजूर प्रमुख ५ मुख्य रस्ते आणि अंतर्गत ३ असे ८ रस्त्यांच्या रुंदीकरणाआड येणारी ५ हजार बांधकामे जमीनदोस्त केली. पाडापाडीनंतर महापालिकेला पेडको आणि टेक्नोजेम एजन्सींकडून डीपीआर तयार करण्याचे काम सुरू केले असून, या सर्व रस्त्यांसाठी किमान २ हजार कोटी रुपयांचा निधी लागणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी देण्यास नकार दिल्यानंतर आता महापालिकेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज (दि.१७) प्रस्तावाद्वारे साकडे घातले जाणार आहे.
शहरात येत्या दोन वर्षांत टोयोटा आणि जेएसडब्ल्यू, ल्युब्रीझॉल आणि अथर या कंपन्यांचे उत्पादन सुरू होणार आहे. त्यामुळे शहराची वाढ होणार असून, मोठ्याप्रमाणात लघु आणि मध्यम उद्योगही गुंतवणूक करतील. या कंपन्या प्रामुख्याने शहरातील सेवासुविधा आणि दळणवळणावर लक्ष देतात. केवळ याच कारणामुळे शहराचे प्रवेशद्वार आणि अंतर्गत रस्ते मंजूर विकास आराखड्यानुसार करण्यावर महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी भर दिला.
त्यासाठी जुना मुंबई हायवे असलेल्या पडेगाव ते दौलताबाद टी पॉइंटपर्यंतचा रोड, जालना रोडवरील बाबा पेट्रोलपंप ते केंब्रीज शाळा चौक,जळगाव रोडवरील सिडको चौक ते हसूल आणि दिल्लीगेट ते हसूल, बीड बायपास रस्त्यावर महानुभव आश्रम चौक ते देवळाई चौक आणि पैठण रोडवरील महानुभव आश्रम चौक ते नक्षत्रवाडी या रस्त्यांच्या रुंदीकरण -आड येणारी बांधकामे जमीनदोस्त केली. आता या जागेत दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड, मुख्य रोड आणि दोन्ही बाजूंनी हरीत पट्टा, फुटपाथ असे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे. त्यासाठी पेडको आणि टेक्नोजेम या एजन्सीकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात आहे.
आराखड्याच्या प्राथमिक अंदाज पत्रकानुसार किमान २ हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांनी शहराच्या विकासाचा हा प्रस्ताव उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला. परंतु त्यांनी निधी देण्यास नकार देत ठाणे, कल्याणप्रमाणे या रस्त्यांसाठी महापालिकेने कन्स्ट्रक्शन टीडीआर पॉलिसी वापरून निधी उभारावा, असा सल्ला दिला.
महापालिकेने पुढील १० ते १५ वर्षांचा विचार करून विकासावर भर दिला आहे. त्यामुळे पाडापाडीनंतर या मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा भार लक्षात घेत रस्ते कामाचा डीपीआर तयार केला जात आहे. हा प्रस्ताव मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणानिमित्त शहरात येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा २ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.