Medieval Chhatrapati Sambhajinagar : मध्ययुगीन सत्तास्थान छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्या मते, प्राचीन दक्षिणापथाचे प्रवेशद्वार म्हणून छत्रपती संभाजीनगरचे धोरणात्मक स्थान हे या प्रदेशात अनेक राजवंशांचा उदय आणि पतन होण्याचे मुख्य कारण होते.
Medieval Chhatrapati Sambhajinagar
मध्ययुगीन सत्तास्थान छत्रपती संभाजीनगर pudhari photo
Published on
Updated on

नीती मेहेंदळे

आटपाट नगरांच्या कहाण्या कधी कुठे वळण घेऊन विसावतील काही नेम नाही. कधी नदी विशिष्ट वळण घेऊन एखाद्या गावाला कवेत घेऊन असते, तर कधी दोन किंवा जास्त नद्या एकाच गावातून वेगवेगळ्या दिशांना वाहत त्या गावाला सुजलाम् सुफलाम् करत असतात. मराठवाडा विभाग महाराष्ट्राचा सर्वात अधिक स्थापत्यविशेषांनी भरलेला आहे असं म्हटलं तर वादाचा मुद्दा होऊ नये. त्या भागाच्या राजधानीचं शहर मानलं जाणारं औरंगाबाद, आजचं छत्रपती संभाजीनगर असंच एक ऐतिहासिक शहर आहे. पूर्वेला सुखना नदीच्या काठी वसलेलं हे शहर, खाम नदी दुसर्‍या बाजूला पश्चिम दिशा शहराला सांभाळत वाहते आहे. या शहरावर अनेक स्वकीय-परकीय राजवटी राज्य करून गेल्या.

महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्या मते, प्राचीन दक्षिणापथाचे प्रवेशद्वार म्हणून छत्रपती संभाजीनगरचे धोरणात्मक स्थान हे या प्रदेशात अनेक राजवंशांचा उदय आणि पतन होण्याचे मुख्य कारण होते. नावाचा महिमा असतोच. तसाच याही शहराचा आहे. तो जाणून घ्यायचा म्हणजे पुष्कळ मागे जावं लागतं. सातवाहन राजवंशाची शाही राजधानी (इ.स.पू. पहिले शतक - दुसरे शतक इ.स.) पैठण हे गोदावरी नदीच्या काठावर असलेले प्राचीन शहर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे.

ऐतिहासिक आणि मध्ययुगीन काळात ते प्रतिष्ठान म्हणून ओळखले जात असे. जे अनेक साहित्यासाठी प्रसिद्ध होते. तसेच यादव राजवंशाची राजधानी (इ.स. 9 वे शतक - 14 वे शतक इ.स.) देवगिरी, म्हणजे आधुनिक संभाजीनगरच्या हद्दीत असलेलं दौलताबाद. या देवगिरीहून यादवांनी तुंगभद्रा आणि नर्मदेच्या नद्यांमधील महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील काही भाग व्यापलेल्या प्रदेशांवर राज्य केले. म्हणून यादवांची राजधानी देवगिरी समजली जायची.

Medieval Chhatrapati Sambhajinagar
मराठीचा ग्रंथव्यवहार

इ.स. 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने यादव राजा कृष्णदेवराय याचा पराभव केला आणि ते शहर गुलाम-सेनापती मलिक काफूरच्या ताब्यात दिले. पुढे इ.स. 1327 मध्ये, सुलतान मुहम्मद बिन तुघलकच्या कारकिर्दीत दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवण्यात आली, ज्याने दिल्लीच्या लोकसंख्येचे दौलताबाद येथे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्याचे आदेश दिले; तथापि, मुहम्मद बिन तुघलकने 1334 मध्ये आपला निर्णय उलटवला आणि राजधानी दिल्लीला परत हलवण्यात आली.

इ.स. 1499 मध्ये, दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा एक भाग बनले, ते तब्बल शंभरेक वर्षे राहिले. इ.स. 1610 मध्ये, इथिओपियन लष्करी नेता मलिक अंबरने, अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून आधुनिक छत्रपती संभाजीनगरच्या ठिकाणी खडकी नावाचे एक नवीन शहर स्थापन केले. मलिक अंबरनंतर त्याचा मुलगा फतेह खान आला, ज्याने शहराचे नाव बदलून फतेहनगर केले.

इ.स. 1636 मध्ये, दख्खन प्रदेशाचा तत्कालीन मुघल सम्राट असलेल्या औरंगजेबाने हे शहर मुघल साम्राज्यात समाविष्ट केले. 1653 मध्ये, औरंगजेबाने शहराचे नाव औरंगाबाद असे ठेवले आणि ते दख्खन प्रदेशाची स्वतःची राजधानी बनवले. 1684 नंतर औरंगजेबाने शहरात न राहण्याचा निर्णय घेतला असला तरी, मुघल दख्खनच्या प्राथमिक लष्करी चौकी म्हणून शहराचे महत्त्व कायम राहिले, ज्यामुळे संपत्ती आकर्षित झाली आणि औरंगाबादला व्यापाराचे केंद्र बनले; या काळात भरतकाम केलेल्या रेशीमांचे उत्पादन उदयास आले आणि आजही औरंगाबादमध्ये केले जाते. इथली प्रसिद्ध हिमरु शाल म्हणजे औरंगाबादची ओळख म्हणता येईल. औरंगाबाद हे एक सांस्कृतिक केंद्रदेखील होते. पाणचक्की वस्तुसंग्रहालयात अनेक ऐतिहासिक ग्रंथ आढळतात.

1,000 निवडक सैन्यासह, छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे जाताना औरंगाबाद येथे पोहोचले. औरंगाबादचा अधिकारी सफशिकन खान त्यांच्याशी तुच्छतेने वागला. या कृत्याबद्दल, जयसिंगने त्याला कडक शब्दांत फटकारले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यास भाग पाडले असाही इथला इतिहास आहे. आणखी एक ओळख म्हणजे इ.स. 1724 मध्ये, दख्खनचा मुघल गव्हर्नर निजाम असफ जाह पहिला याने मुघल साम्राज्यापासून वेगळे होऊन स्वतःचा राजवंश स्थापन केला. या राजघराण्याने हैदराबाद राज्याची स्थापना केली, ज्याची राजधानी हैदराबादला हस्तांतरित होईपर्यंत औरंगाबाद येथे होती.

या शहराचे आणि जिल्ह्याचे नामकरण आता छत्रपती संभाजी नगर असे करण्यात आले आहे. शहराला मध्ययुगात 52 दरवाजे होते, त्यापैकी काही अजूनही अस्तित्वात आहेत, ज्यामुळे औरंगाबादला दरवाज्यांचे शहर असे टोपणनाव मिळाले आहे. सध्याच्या या शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आढळतात, पैकी पाणचक्की एक महत्त्वाची वास्तू आहे जी मध्ययुगीन भारतीय वास्तुकलेतील वैज्ञानिक विचारप्रक्रियेचे प्रदर्शन करते. डोंगरावरील झर्‍यातून खाली आणलेल्या पाण्याद्वारे ऊर्जा निर्माण करण्यासाठी तिची रचना करण्यात आली होती. या पाणचक्कीला एका भूमिगत जलवाहिनीद्वारे पुरेसे पाणी दिले जाते, जी आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या हर्सूल नदीच्या संगमाच्या वरच्या विहिरीपासून सुरू होते आणि तिच्यात एक उपनदीही येऊन मिळते.

ही व्यवस्था अशी आहे की गिरणी चालविण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती निर्माण करण्यासाठी पाणी पाणचक्कीच्या टाक्यात बरेच उंचीवरून सोडले जाते. जास्तीचे पाणी खाम नदीत सोडले जाते. तिथून खाम नदीचे आणि संपूर्ण शहराचे विलोभनीय दर्शन होते. शहरात बीबी का मकबरा ही अजून एक ताजमहालच्या धर्तीवर बांधलेली प्रतिकृती म्हणता येईल अशी वास्तू आहे. शहराच्या आजूबाजूलाही ऐतिहासिक नमुने आढळतात. शहराच्या वायव्येस दौलताबाद अर्थात, देवगिरी शहर आहे.

सहाव्या शतकाच्या सुमारास, देवगिरी हे शहराजवळील एक महत्त्वाचे उंचावरील शहर म्हणून उदयास आले, जे पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणार्‍या व्यापारी मार्गांवर होते. शहरातील ऐतिहासिक त्रिकोणी किल्ला सुरुवातीला 1187 च्या सुमारास पहिल्या यादव राजा भिल्लमाने बांधला होता अशी नोंद सापडते. किल्ल्याच्या परिसरात अनेक मोठ्या बारवा आढळतात. किल्ल्याला काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.

या किल्ल्यापासून वेगळा बाहेर पडण्याचा मार्ग नाही, फक्त एकच प्रवेशद्वार/बाहेर पडण्याचा मार्ग आहे. मात्र किल्ल्यात खोलवर गुंतवत राहणारा भुलभुलैय्या हे त्याचं स्थापत्य विशेष. दुसरं म्हणजे किल्ल्याला समांतर दरवाजे नाहीत. तसेच, ध्वजस्तंभ डाव्या टेकडीवर आहे; परंतु किल्ल्याचे खरे दरवाजे उजवीकडे आणि खोटे दरवाजे डावीकडे असल्याचे दिसून येतात. अशी प्रवेशमार्गांची जटिल व्यवस्था, वक्र भिंती, दरवाजे हे सर्व दिसून येते. शेवटी किल्ल्याभोवती असलेल्या खंदकात मगरी होत्या. असा बेलाग किल्ला ही शहराची अजून एक शान आहे.

छत्रपती संभाजीनगरला लागून लेणी आहेत. ही एकूण 12 लेणी असून शहरातल्या प्रसिद्ध अजंठा आणि वेरूळ लेण्यांपेक्षा संख्येने लहान तरी महत्त्वाची आहेत. शहरात आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयदेखील आहे. सोनेरी महाल, हिमायत बागसारख्या अनेक मध्ययुगीन इमारती, दरवाजे, अनेक मंदिरं असा भक्कम दस्ताऐवज शहर आजही बाळगून आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही काही ऐतिहासिक वास्तू आहेत. गावाजवळच्या रामपुरी गावाबाहेर एका प्राचीन मंदिराचे पडझड झालेले अवशेष आहेत. सुलीभंजन या शेजारच्या गावात परियों का तालाब नावाचे एक रम्य स्थळ आहे.

प्राचीन काळात म्हणे इथे साती आसरा पर्‍या किंवा यक्षिणी स्नानासाठी येत असत. ज्येष्ठ लेखक रा. भि. जोशी यांच्या ‘मजल दरमजल’ पुस्तकात या तलावाचं सुंदर वर्णन आढळतं. त्या तलावाजवळ एका मशिदीत प्राचीन शिवमंदिरदेखील आहे. अजिंठा आणि वेरुळ ही दोन शहराच्या दोन दिशांना असलेली महत्त्वाची शहरं आणि त्यांनी आपल्या भागात असलेल्या स्थापत्याच्या अस्तित्वामुळे जागतिक वारसा स्थळ म्हणून सिद्ध केलं आहे आणि म्हणून ती दोन्ही शहरं महाराष्ट्राला गौरवपूर्ण आहेत. पण त्यांच्याविषयी स्वतंत्र लिहावं लागेल. छत्रपती संभाजीनगरचा स्वतःचा शहरनामाच स्वयंपूर्ण व दीर्घ आहे. तो मांडणं आणि जपणं दोन्ही आवश्यक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news