

नितीन थोरात
वैजापूर पुढारी वृत्तसेवा: आजच्या काळात माणुसकी हरवली असल्याची हळहळ अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र अजूनही समाजात करुणा, माया आणि माणुसकी जिवंत असल्याचं दाखवून देणारी घटना वैजापूरात घडली असून, या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. (२७ ) ऑगस्ट रोजी पहाटे तीनच्या सुमारास वैजापूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या समोर एका मानसिक रुग्ण महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली.
पती दारुड्या स्वभावाचा
अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. त्या महिलेचं नाव सुवर्णा मोरे (वय ३२, रा. भटाणा) असून, तिचा पती दारुड्या स्वभावाचा असल्याने त्यानेच प्रसूतीच्या अवस्थेत तिला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अचानकपणे आई व नवजात बाळ उघड्यावर अडचणीत असताना, ही घटना कळताच आसरा फाऊंडेशनचे वाहेद पठाण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून नर्सला बोलावून घेतले. प्रसूतीनंतर त्या महिलेचा मानसिक आजारामुळे आक्रमक स्वभाव प्रकर्षाने दिसून आला आणि तिने नर्सवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला; मात्र नर्सच्या चातुर्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या घटनेत वाहेद पठाण यांच्यासह प्रकाश पवार, अभिषेक देशमुख, इरफान पठाण, मंगेश खाडे, आमरुत वळवी या सामाजिक कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या तत्परतेमुळे आई-बाळाचे जीव वाचले आणि वैजापूरकरांनी पुन्हा एकदा माणुसकीची ताकद अनुभवली.
यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर मुंडे व त्यांच्या टिमने आई व बाळाला दवाखान्यात दाखल करून तातडीने आवश्यक उपचार केले. तपासणीनंतर दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आई व बाळाला सुखरूप घरी पोहोचवण्यात आले.
अधीक्षकांची तत्परता कौतुकास्पद..
घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक बी.एन मोरे हे सतत संपर्कात राहून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. डॉक्टर व नर्सच्या टीमला आवश्यक मार्गदर्शन करत आई व बाळाला सुरक्षित करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा ठरला.
हे आमचे कामच आहे.नवजात बाळ आणि बाळंतीण दोघांवरही योग्य उपचार करून तिच्या कुटुंबाचे समुपदेशनही केले आहे. मात्र अशा घटना घडायला नको..
डॉ. सुधाकर मुंडे, वैद्यकीय अधिकारी