

Chhatrapati Sambhaji nagar NCP Office: छत्रपती संभाजीनगर शहरातील कैलासनगर भागात मध्यरात्री एका अज्ञाताने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवाराचे प्रचार कार्यालय चक्क जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, निवडणुकीच्या वातावरणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लोकशाहीच्या उत्सवात अशा प्रकारच्या हिंसक कृत्यांमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कैलासनगर येथील या प्रचार कार्यालयात मध्यरात्री काही नागरिक आणि कार्यकर्ते झोपलेले असताना ही घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न केला. आग लागल्याचे लक्षात येताच कार्यालयातील लोकांनी तातडीने धाव घेतली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार केवळ कार्यालय जाळण्याचा नसून लोकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न होता.
या घटनेनंतर संबंधित उमेदवाराने माध्यमांशी बोलताना विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसची या भागात परिस्थिती भक्कम आहे, हे पाहूनच कोणीतरी लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणारे लोक आहोत. या धडपशाहीला किंवा भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही. आम्ही रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत."
छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. अशातच उमेदवारांच्या कार्यालयावर हल्ले होणे, ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत.