

Chemical truck accident in Ajanta Ghat; two injured
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर येथील अजिंठा घाटात शुक्रवारी रात्री अपघात झाला. विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथून टाईल्स निर्मितीसाठी २९ टन केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचे घाट उतरताना ब्रेक निकामी झाल्याने ट्रक रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केमिकलने भरलेले ड्रम सुमारे २०० फूट खोलदरीत कोसळून सर्वत्र पसरले.
अपघातग्रस्त ट्रक क्र. (ए पी १६ टी क्यू २२५६) हा शुक्रवारी रात्री सुमारे ११:३० वाजेच्या सुमारस अजिंठा घाटात पोहोचला होता. उतारावर येताच ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित झालेला ट्रक पलटी झाला.
पलटी झालेल्या ट्रकमधील निळ्या रंगाचे मोठे ड्रम रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत घसरून पडले. घटनास्थळी केमिकलचे ड्रम विखुरलेले दिसून येत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातात चालक शेख करीम मुल्ला (वय ४६, रा. विजयवाडा आंध्रप्रदेश) यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तर क्लिनर तिरुपतीराव रघुपतीराव (वय ५२, रा. विजयवाडा आंध्रप्रदेश) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या उजव्या हाताला गंभीर इजा झाली.