Baiju Patil : बैजू पाटील यांच्या ‘अग्निदिव्यातून झेप’ छायाचित्राला जागतिक स्पर्धेत प्रथम पुरस्कार

Baiju Patil : बैजू पाटील यांच्या ‘अग्निदिव्यातून झेप’ छायाचित्राला जागतिक स्पर्धेत प्रथम पुरस्कार
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देश आणि जगभरातील जंगलांची भ्रमंती करून एकाहून एक सरस वाइल्डलाइफ फोटो काढत आजवर १३२ हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत पुरस्कार मिळवले. अशी उल्लेखनिय कामगिरी करणारे बैजू पाटील यांच्या 'विंग्ज ऑन फायर' या बर्ड कॅटेगरीतील ड्रोंगो म्हणजेच कोतवाल पक्ष्याच्या छायाचित्राला पोर्तुगालमध्ये पार पडलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. (Baiju Patil)

जागतिक स्तरावरील 'एफआयआयएन' हा पुरस्कार मिळाला. जगभरातून आलेल्या ८ हजार ८०० फोटोंमध्ये बैजू यांच्या फोटोला पहिला मान मिळाला. पोर्तुगाल गाला येथे नुकताच पुरस्कार सोहळा पार पडला. प्रसिद्ध वाइल्डलाइफ फोटोग्राफर बैजू पाटील हे मागील ३७ वर्षांपासून या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत आहेत. वाइल्डलाइफ क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ असे क्षण त्यांनी कॅमेऱ्यात टिपले आहेत. पुरस्कार प्राप्त पक्ष्याचा हा फोटो बैजू यांनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील धारूर येथे दुर्गम भागात जाऊन काढले आहेत. (Baiju Patil)

वास्तविक पाहता बैजू पाटील मागील चार वर्षांपासून हे क्षण टिपण्यासाठी सातत्याने या ठिकाणी जात होते. पण हवा तसा फोटो त्यांना मिळत नव्हता. परंतु, सलग तीन वर्ष अथक परिश्रम घेऊनही फोटो मिळाला नसला तरी त्यांनी आशा सोडली नाही. हा फोटो घेण्यासाठी बैजू यांना आधी पक्ष्याच्या वागण्याचा सखोल अभ्यास करावा लागला. कुठल्या वेळेला हे पक्षी येतात. आग लागल्यानंतरही किडे खाण्यासाठी त्यांची नेमकी धडपड कशी असते, याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्या भागात तळ ठोकून मनासारखा क्षण कॅमेऱ्यात टिपेपर्यंत त्यांनी माघार घेतली नाही. शेवटी मागील वर्षी हा फोटो घेण्यात त्यांना यश मिळाले. पुरस्काराबद्दल बैजू पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Baiju Patil : फोटो घेताना आगीच्या झळा सोसल्या

फोटो घेताना आगीच्या झळा सोसल्या, शूजचे सोलही जळाले. आगीच्या ज्वाळा भडकल्या असतानाही ड्रोंगो जेव्हा भक्ष्य पकडण्यासाठी त्याच्याकडे झेप घेतो, तो क्षण टिपणे सोपे नव्हते. यासाठी बैजू यांनी आधी अभ्यास तर केलाच पण स्वत: त्यांना आगींच्या झळा सोसाव्या लागल्या. बऱ्याच वेळा आगीच्या संपर्कात राहिल्याने त्याच्या झळा लागून कॅमेरा मध्येच गरम व्हायचा, ज्वाळांच्या शेजारी बराच वेळ राहिल्याने बऱ्याचदा चटकेही बसायचे. हा फोटो घेण्याच्या प्रयत्न करत असताना एकदा तर बैजू यांच्या बुटाचा सोल पूर्णपणे आगीत जळून गेला व पायाला चटके बसले.

ज्वाळांचा भडका अन् भक्ष्यावर लक्ष जगातील पहिल्या क्रमांकाचा हा फोटो बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात काढला आहे. या भागात जेव्हा शेतामध्ये ऊस तोडणी होते. तेव्हा उरलेली पाचट शेतकऱ्यांकडून जाळण्यात येते. मोठ्या प्रमाणात पाचट जळते, तेव्हा परिसरात प्रचंड धूर पसरतो. हा धूर पाहून ड्रोंगो या दिशेने उडून येतात. आग लावल्यामुळे पाचटावरील असंख्य किडे हवेत उडू लागतात. हे किडे ड्रोंगोचे भक्ष्य असल्याने तो किड्यांना पकडण्यासाठी ज्वाळांच्या मधून मार्ग काढत त्यांच्याकडे झेपावतो. दिवस उजाडतो किंवा मावळतीला जातो. त्यावेळी बऱ्याचदा हे चित्र पाहायला मिळते. किडे पकडण्याची ही क्रिया पापणी झाकून उघडेपर्यंत पूर्ण होत असल्याने त्याचा फोटो मिळणे, तसे फार अवघड असते. पण योग्य नियोजन आणि सातत्याने प्रयत्न केल्यास काहीच अशक्य नाही, हे बैजू पाटील यांनी दाखवून दिले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news