

Cases will be filed against those obstructing development works!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विकासकामांना अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असे संकेत सोमवारी (दि.६) महापौर समीर राजुरकर यांनी दिले. एमआयएमने सिडको एन-१२ परिसरातील कचरा ट्रान्सफर स्टेशन बंद करण्याच्या मागणीवरून आंदोलनाचा इशारा देताच महापौरांनी ठाम भूमिका घेतली. संबंधित ठिकाणी कचरा डेपो नसून केवळ ट्रान्सफर स्टेशन आहे. ते शहर विकासाचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी महापौर राजुरकर म्हणाले, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात कचरा संकलन केले जाते. यात ओला व सुका कचरा वेगळा केला जातो. तो डेपोपर्यंत पोहोचवण्यासाठी शहरातील नऊ ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीन येत आहेत.
त्यापैकी सध्या सिडको एन-१२, शिवाजीनगर, समर्थ नगर, रामनगर आणि मजनू हिल या परिसरांत ट्रान्सफर स्टेशन कार्यरत असून, उर्वरित चार ठिकाणीही लवकरच काम सुरू होणार आहे. मात्र याला प्रत्येक ठिकाणी विरोध होत राहिला, तर नगरसेवक आपल्या प्रभागातून ही सुविधा हटवण्याची मागणी करतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या ट्रान्सफर स्टेशनमुळे घंटागाड्यांमधून येणारा ओला कचरा व्हॅक्युम प्रणालीद्वारे थेट डेपोपर्यंत पाठवणे सुलभ होणार आहे. तसेच घंटागाड्यांची नियमित स्वच्छता केल्यामुळे दुर्गंधीही पसरू नये, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते समीर साजेद यांनी एन-१२ येथील ट्रान्सफर स्टेशन हलवण्याची मागणी केल्याची माहिती महापौर राजुरकर यांनी दिली. यावर अनेक वर्षे कोणताही आक्षेप नव्हता, मात्र आता अचानक विरोध का होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे कचरा डेपो नसून, केवळ प्रक्रिया केंद्र असल्याचे राजुरकर यांनी स्पष्ट करत नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र अन्यत्र हलवण्याची मागणी
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एन-१२ परिसरात दोन मंदिरे आणि समोर कर्करोग रुग्णालय असल्याचे सांगत नागरिक, रुग्ण व भाविकांना त्रास होत असल्याचा दावा केला. त्यामुळे हे केंद्र अन्यत्र हलवण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर एमआयएम पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन सिडको एन-१२ येथील ट्रान्सफर स्टेशनविरोधात जोरदार विरोध दर्शवला.
अन्यथा माझ्यावरही कारवाई व्हावी
यावेळी महापौर राजुरकर यांनी एकाच्या मागणीनुसार बदल केल्यास इतरही नगरसेवक आपल्या प्रभागातील केंद्र हटवण्याची मागणी करतील. त्यामुळे शहरातील विकासकामांवर परिणाम होऊ शकतो. समर्थनगर प्रभागातही असेच केंद्र असून, मी स्वतः त्याचा विरोध करत नाही अन्यथा माझ्यावरही कारवाई व्हायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.