

Police raided locations in Kannad, Vaijapur, and Sillod in connection with the sale of nylon kite string.
कन्नड / वैजापूर/सिल्लोड,
पुढारी वृत्तसेवा : कन्नड, वैजापूर, सिल्लोड येथे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी बुधवारी (दि.१०) छापे टाकले.
मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्याचा छंद मोठ्या प्रमाणावर जोपासला जातो. मात्र काही जण दोऱ्याऐवजी नायलॉन मांजाचा वापर करीत असल्याने पक्षी, लहान मुले तसेच वाहनचालक गंभीर जखमी होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. नायलॉन व सिंथेटिक मांजा धोकादायक असल्याने त्याच्या विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अशा बंदी असलेल्या मांजावर पोलिसांची करडी नजर असून, स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.
कन्नड येथे शिवनगर येथील एका घरासमोर असलेल्या मोकळ्या आवारात बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली होती. बुधवारी सायंकाळी छापा टाकून ७,६४० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शेख नासेर शेख कबीर (रा. शिवनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक विजयकुमार राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन हिंगमीरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक वाघ, विष्णू गायकवाड, अनिल काळे, महेश बिरोटे, संजय तांदळे तसेच महिला पोलिस अंमलदार प्रिया भंडारे यांच्या पथकाने केली.
वैजापुरात एक जण ताब्यात
छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि.९) शहरातील दर्गा बेस भागात छापा टाकून नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. फारुख मोहम्मद शेख (रा. दर्गा बेस) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून तीन प्लास्टिक चक्री व एक लाकडी चक्री नायलॉन मांजा असा २ हजार ६०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे. त्याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फारुख मोहम्मद शेख हा वैजापूर येथे बंदी असलेला चायनीज नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलिस निरीक्षक इंगळे, पोलिस अंमलदार विष्णू गायकवाड, अशोक वाघ, शिवानंद बंनगे, अनिल काळे, महेश बिरुटे, सनी खरात, संजय तांदळे व महिला पोलिस अंमलदार भंडारे यांनी छापा टाकून ही कार्यवाही केली.
सिल्लोडमध्ये एकावर गुन्हा दाखल
पतंग उडवण्यासाठी विक्रीसाठी आणलेला घातक नायलॉन मांजा विकणाऱ्या एकाला गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.१०) दुपारी शहरातील करिमोद्दीन नाना चौकातील एका पतंग दुकानावर करण्यात आली. शेख मलिक शेख खलिक (रा. सिल्लोड) असे या प्रकरणी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पथक शहरात फिरत असताना त्यांना शहरातील करिमोद्दीन नाना चौकातील एका पतंग दुकानावर नायलॉन मांजा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी छापा मारला. यात १ हजार रुपये किमतीचा मनॉट यूज फॉर काइट फ्लाइंगफ असा मजकूर लिहिलेला नायलॉन मांजा मिळून आला. पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.