

Car Rammed into Corporator After Failed Theft Attempt
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गारखेडा परिसरात मध्यरात्री चोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकाच्या अंगावर स्कार्पिओ गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत चोरटे सुसाट पसार झाले. ही घटना बुधवारी (दि.६) रात्री २:१० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात दोन चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नगरसेवक मुन्शी भिकन शेख (४२, रा. प्लॉट नं ८, भगतसिंग नगर, गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी मध्यरात्री १:५० वाजेच्या सुमारास मुन्शी शेख हे आपले वैयक्तिक काम आटोपून घरी परतले होते. हॉलमध्ये बसलेले असताना त्यांची नजर सीसीटीव्हीच्या स्क्रीनवर गेली.
पहाटे २:१० च्या सुमारास एक व्यक्ती घरासमोर पार्क केलेली त्यांच्या मामाच्या मुलाची स्कॉर्पिओ गाडीचा दरवाजा उघडून आत वसल्याचे दिसले. या चोराने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स घातली होती. गाडी चोरीला जात असल्याचे पाहून शेख तातडीने घराबाहेर धावले.
त्यांना पाहताच तो चोर गाडीतून उतरला आणि बाजूलाच पार्क केलेल्या त्यांच्या साथीदारांच्या दुसऱ्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये घाईघाईने बसला. शेख त्याला पकडण्यासाठी धावले असता, या चोरांनी शेख यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. शेख यांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्याने ते थोडक्यात बचावले.
शेख यांनी आपली फॉर्च्यूनर गाडी काढून या चोरांचा पाठलाग सुरू केला. सूतगिरणी चौक, दर्गा चौक, उस्मानपुरा, देवगिरी कॉलेज, पदमपुरा चौक, बाबा पेट्रोलपंप, कर्णपुरा, नगरनाका आणि पडेगाव मार्गे शरणापूर फाटा असा सोलापूर-धुळे मार्गापर्यंत त्यांनी पाठलाग केला, मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. या थरारक घटनेनंतर मुन्शी शेख यांनी पुंडलिक नगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पुढील तपास हवालदार सुरेश तरव करत आहेत.