

छत्रपती संभाजीनगर : पुंडलिकनगर भागातील कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे काढणारी आणि पोलिसांच्या अस्तित्वालाच थेट आव्हान देणारी संतापजनक घटना पुंडलिकनगरमध्ये घडली आहे. जेलमधून सुटून जेमतेम महिना उलटत नाही तोच कुख्यात गुंड पवन दिवेकरने अत्यंत वर्दळीच्या हनुमान चौकात राडा घालत थेट गोळीबार केला आहे. गुरुवारी (दि. १६) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
दोन दिवसांपूर्वी एका मिरवणुकीत नाचण्यावरून दिवेकरचा नातेवाईक कुणाल साळवे आणि सुरेश रांजणे यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. दुपारी या दोघांमध्ये चांगलाच बाद झाला. मात्र गुरुवारी रात्री हनुमान चौकात हे दोन्ही गट पुन्हा आमनेसामने भिडले. बाद विकोपाला जाताच कुणालने गुन्हेगार पवन दिवेकरला कॉल लावून मदतीसाठी बोलावून घेतले होते. हातात बिअरची बाटली आणि तोंडातून शिव्यांची लाखोली वाहत पवन दिवेकरने फिल्मी स्टाईलने घटनास्थळी एन्ट्री मारली. - कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून त्याने थेट रांजणेशी वाद घातला.
अत्यंत निर्वावलेल्या या गुंडाने गर्दीतून बाजूला जात आधी टपरीवरून गुटखा घेतला आणि शांतपणे तोंडात टाकला. तोपर्यंत समोरच्या गटाचा आवाज वाढल्याचे पाहून - संतापलेल्या दिवेकरने घोळक्याच्या मधोमध शिरून हवेत गोळीचा पहिला राऊंड फायर केला. - आजूबाजूला लोकांची पळापळ सुरू झाली, पण या गुंडाची मस्ती एवढी होती की, त्याने लगेचच दुसरा राऊंडही फायर केला.
गोळीबाराच्या आवाजाने नागरिकांची धावपळ उडाली. घटनास्थळी गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले, पंकज अतुलकर, गुन्हे एसीपी मनीष कल्याणकर गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, एपीआय कन्हाळे, पीएसआय अर्जुन कदम, विनोद भालेराव, अर्जुन राऊत यांनी धाव घेतली होती. दंगा काबू पथक, राखीव पोलिस बल चौकात तैनात करण्यात आले होते.
काय करणार पोलिस ? भरचौकात गुंडाची मग्रुरी !
गोळीबारानंतर पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकून पवन दिवेकरने अंधाराचा फायदा घेत तिथून पोबारा केला, मात्र त्याचा नातेवाईक कुणाल साळवे तिथेच छाती पुढे काढून उभा होता. काय करणार पोलिस? असे म्हणत तो खाकी वर्दीला खुले आव्हान देत होता. पोलिसांनी साळ-वेच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला गाडीत कोंबले.
कोण आहे हा पवन दिवेकर?
पुंडलिकनगर आणि मुकुंदवाडी परिसरात हा सराईत गुन्हेगार पीडी कंपनी या नावाने आपली गैंग चालवतो. याच्यावर खुनाचा गुन्हा (२०१९) तसेच जीवघेणे हल्ले, चाकूने मारहाण असे तब्बल १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी भररस्त्यात टोळीसोबत हातात चाकू घेऊन डान्स करताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तेव्हा गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. जेलमधून बाहेर येताच या कुख्यात गुंडाने थेट गावठी कट्टा चालवून दहशत माजवल्याने पुंडलिकनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.