

Bulldozer to Roll Over MIM Corporator Matin's House and Office
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला गुरुवारी (दि. ७) छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक झाली. ती एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरात लपून बसली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही सहआरोपी केले असून या कारवाईनंतर आता महापालिकेनेही त्याच्याविरोधात कंबर कसली आहे. शनिवारी (दि. ९) प्रशासनाने नारेगाव रोड आणि कैसर कॉलनी या दोन ठिकाणच्या त्याचा बेकायदा घरांसह दुकाने आणि कार्यालयांना नोटीस बजावून अनधिकृत बांधकामे का पाडू नये, असा इशारा दिला आहे.
शहरात ज्या भागातील अनधिकृत मालमत्तांमुळे गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांना पाठबळ मिळत आहे. त्याविरोधात महापालिका व पोलिस प्रशासनाने बुलडोझर कारवाई करण्यावर भर दिला आहे. यापूर्वी गतवर्षी मुकुंदवाडीत एका तरुणाचा खून झाला होता.
त्या घटनेनंतर परिसरातील गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवाया नियंत्रणात आणण्यासाठी या भागातील सुमारे सव्वाशेही अनधिकृत मालमत्तांवर बुलडोझर चालविले होते. या कारवाईनंतर पैठणगेट येथेही महापालिकेने बुलडोझर चालविले होते. या भागात तरुणाचा खून झाल्याने प्रशासनाकडे मृताच्या नातेवाईकांनीच बुलडोझर कारवाईची मागणी केली होती. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणात आरोपी असलेल्या निदा खानला दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, निदा खान ही मागील चार दिवसांपासून नारेगावातील एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरात लपली होती, असे पोलिस चौकशीतून पुढे आले आहे त्यावरुन पालकमंत्री संजय शिरसाट, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी आश्रयदात्या मतीनसह एमआयएमवर कारवाईची मागणी केली आहे.
तसेच नारेगाव भागात मोठ्याप्रमाणात गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवाया सुरू असून येथील गुन्हेगारीला पाठबळ देणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील होत आहे. त्यात शनिवारी महापालिकेने आरोपीला साथ देणारा आयाम नगरसेवक मतीन पटेल याच्या नारेगाव व कैसर कॉलनी भागातील बेकायदा बांधकामांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये मालमत्ताधारक मतीन पटेल व त्याच्या मालमत्तांचे वर्णन करण्यात आले आहे. ज्यामध्ये २ ठिकाणी घरे, एका ठिकाणी दुकाने आणि कार्यालयाचा समावेश आहे. त्या का पाडण्यात येऊ नये, असेही त्यात नमूट आहे
नगरसेवक पदही धोक्यात
एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्या नारेगाव, कैसर पार्क येथील मालमत्तांना महापालिकेने नोटीस बजावत बेकायदा बांधकाम का पडू नये, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता हे बांधकाम बेकायदा आढळल्यास मतीनचे नगरसेवक पदही धोक्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बेकायदा मालमत्तांना नोटीस
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने नारेगाव, कौसर पार्क येथील त्या तिन्हीही मालमत्ता अनधिकृत आहेत, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शनिवारी या मालमत्तांवर नोटीस चिटकवण्यात आली आहे. त्यात अनधिकृत मालमत्ता का पाडू नये, असे नमूद आहे. - संतोष वाहुळ, मुख्य अतिक्रमण हटाव अधिकारी.
३ दिवसांची मुदत
या तिन्ही बेकायदा बांधकामांबावत मालमत्ताधारक एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यास तीन दिवसांत खुलासा सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. खुलासा सादर केला नाही. तर एकतर्फी निर्णय घेऊन कारवाई करेल.