

Break in encroachment removal campaign during Diwali
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्या सणात छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी गुरुवारी (दि.२९) माजी आमदार संजय केणेकर यांनी निवेदनाद्वारे महापौर व स्थायी समिती सभापतींकडे केली. यावर सणासुदीच्या काळात शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार नसल्याचे महापौर समीर राजूरकर आणि सभापती अनिल मकरिये यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रस्त्यालगत तात्पुरती दुकाने थाटून दिवाळीच्या काळात चार पैसे कमावण्याच्या प्रयत्नात असलेल्या फेरीवाल्यांसह किरकोळ विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
दिवाळीच्या काळात विविध वस्तूंच्या विक्रीतून उत्पन्न मिळविण्यासाठी अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे तात्पुरती दुकाने लावतात. गुलमंडी, पुंडलिकनगर, सिडको, टीव्ही सेंटर, औरंगपुरा, चिकलठाणा आणि मुकुंदवाडी परिसरांत दिवाळीनिमित्त विक्रेत्यांची दुकाने सजतात. वर्षातील महत्त्वाच्या सणाच्या काळातच अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यास त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती.
ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार संजय केणेकर यांनी गुरुवारी महापौर समीर राजूरकर, सभापती अनिल मकरीये आणि महापालिका आयुक्त अमोल येडगे यांना निवेदन दिले. या निवेदनाद्वारे त्यांनी दिवाळी संपेपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर महापौर राजूरकर आणि सभापतीं मकरिये यांनी दिवाळीत कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे दिवाळीत व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी मोकळीक मिळाली आहे. मात्र, सणाच्या काळात वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता महापालिकेला घ्यावी लागणार आहे.
पुन्हा कारवाईचे संकेत
दिवाळीत व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी मोकळीक मिळाली असली, तरी रस्त्यांवरील अतिक्रमणांचा प्रश्न कायम आहे. महापालिका प्रशासनाकडून भौग्याद्वारे नागरिकांना आणि दुकानदारांना अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याचे आवाहन केले जात आहे. रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, अशी सूचनाही केली जात आहे. मात्र, दिवाळीच्या काळात मोहीम थांबविण्यात आली असली, तरी सणानंतर पुन्हा अतिक्रमण हटाव कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मिळालेला दिलासा तात्पुरता ठरण्याची चिन्हे आहेत. कारवाईदरम्यान साहित्याचे नुकसान टाळण्यासाठी दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले.