

Gangapur Knife Attack Youth
गंगापूर : शहरातील अत्यंत गजबजलेल्या राजीव गांधी चौक परिसरात जुन्या वादाची खुन्नस उफाळून येत एका २३ वर्षीय तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने धारदार चाकूने जीवघेणा हल्ला चढवला. पोट, पाठ, डोके आणि कानाजवळ सपासप वार करून तरुणाला गंभीर जखमी केल्याची थरारक घटना बुधवारी रात्री घडली. या हल्ल्यात दत्तू संतोष भक्कड हा तरुण गंभीर जखमी झाला असून गंगापूर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोघांना ताब्यात घेतले आहे. घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे ८.४५ वाजता राजीव गांधी चौकातील बंडू यांच्या चहाच्या हॉटेलजवळ ही घटना घडली. आरोपी आतिष गायकवाड याने दत्तूला सकाळी आपल्यासह राहुल फुलारे याला शिवीगाळ का केली, असा जाब विचारला.
त्यानंतर आरोपींनी दत्तूला शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी राहुल फुलारे याने चाकूने दत्तूच्या पोटावर, पाठीवर, कानाजवळ व डोक्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
जखमी दत्तूची आई छाया संतोष भक्कड (वय ४०, रा. सखारामपंतनगर, गंगापूर) यांच्या फिर्यादीवरून राहुल फुलारे, आतिष गायकवाड, पवन गायकवाड, करण शिंदे, चेतन गायकवाड आणि विशाल कापसे या सहा जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींबाबत पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.