

boy Kidnapping attempt Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : न्यू एसटी कॉलनी येथील पार्थ विद्यामंदिरात दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अक्षित अजय सानप (७ रा. न्यू एसटी कॉलनी) या विद्यार्थ्याचे दोन तरुणांनी शुक्रवारी (दि.१३) दुपारी अपहरणाचा प्रयत्न केला. अक्षितने ओरडल्याने अपहरणकर्त्याचा डाव फसला. ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी त्या दोघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्थ विद्यामंदिरात शिकणाऱ्या अक्षितची शाळा दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असते. शनिवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेत सेलिब्रेशनचा कार्यक्रम घेण्यात आला, त्यामुळे सर्व मुलांना २.३० वाजता घरी जाण्याची परवानगी दिली.
शाळेतील शिक्षकांनी अक्षितच्या कुटुंबीयांना तो घरी येत असल्याची माहितीही दिली. शाळा जवळच असल्याने तो एकटाच पायी घरी येत होता. दुपारी २.४५ च्या सुमारास स्कुटीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने अक्षितला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
अनोळखी तरुण आपल्याला उचलून नेत असल्याने अक्षितला शंका आली. तत्काळ त्याने जोरात ओरड्याला सुरुवात केली. भर दुपारी आणि घराजवळील चौकातच ही घटना घडल्याने आवाज ऐकून आजूबाजूच्या घरातील मंडळी बाहेर येताच अप-हरणकर्त्यांनी तेथून पळ काढला.
या प्रकरणी प्रकाश अशोक सानप यांच्या तक्रारीवरून अज्ञात अप-हरणकर्त्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या फुटेजवरून त्या दोघांचा शोध घेणे सुरू आहे.