

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना राज्य सरकारच्या वतीने तत्काळ मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 17) जाहीर केले. राज्यातील सरकार मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी किंवा गावकरी यांच्या निश्चितपणे पाठीशी उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृतिस्तंभ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांनी मोठा लढा उभारला. त्यातून मराठवाड्याला मुक्ती मिळाली आणि म्हणून हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाही आहे, तर एकसंध भारतनिर्मितीचा दिवस आहे.
दरम्यान, उबाठा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी कोणतीही नवी घोषणा न केल्याचा आरोप दानवे यांनी केला.