Black-marketing : रेशनसह चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा काळाबाजार

कलीम कुरेशीच्या गोरखधंद्याला गुन्हे शाखेचा दणका
Black-marketing
Black-marketing : रेशनसह चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा काळाबाजारfile photo
Published on
Updated on

Black-marketing of nutritional food meant for young children, alongside ration supplies

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गोरगरीब जनतेच्या हक्काचे रेशन आणि अंगणवाडीतील लहान बालके, गरोदर मातांसाठी शासनाकडून येणाऱ्या पोषण आहाराचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. किराडपुरा भागातील रहेमानिया कॉलनीत टाकलेल्या छाप्यात तब्बल १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार राजकीय पक्षाचा पदाधिकारी कलीम कुरेशी असल्याचे समोर आले आहे.

Black-marketing
Nanded Crime : गांजाची शेती; 1 लाख 3 हजारांचा गांजा जप्त

समीर बाबर कुरेशी (३०), फरदीन गणी पठाण (दोघे रा. चिकलठाणा), फहाद लईक शतुरी (४५, रा. किराडपुरा) अशी अटकेतील, तर आवेज कुरेशी आणि कलीम छोटू कुरेशी व अन्य फरार आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी रविवारी (दि. १४) दिली.

१३ जून रोजी किराडपुरा येथील गल्ली नंबर ५ मधील एम.आर. पॅलेस इमारतीच्या तळमजल्यावरील गोदामावर छापा टाकला. कलीम कुरेशी टोळीने दोन वेगवेगळे काळे धंदे एकाच ठिकाणी थाटले होते. कलीम कुरेशी याने मागील मनपा निवडणुकीतही मोठा राडा केला होता. त्याच्या राजकीय वरदहस्तामुळे हा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, दिनेश बन, संदीप तायडे, योगेश नवसारे, प्रदीप दंडवते, विजय निकम आर्दीच्या पथकाने केली.

रेशनचे धान्य आणि धोकादायक डिझेल साठा

दुसऱ्या कारवाईत याच गोदामातून अंत्योदय योजनेची ४५०० रुपयांची साखर, ४ लाख ३९ हजार ८३० रुपयांचा तांदूळ (१६२ क्विंटल), ७५,६०० रुपयांचा गहू, ज्वारी आणि मका असा लाखोंचा रेशनचा माल सापडला. दाट लोकवस्तीत याच गोदामात १०० लिटर डिझेलचा साठाही आढळून आला. धान्याची वाहतूक करणारा आयशर ट्रक (एमएच-१८-बीएच-७७२०) असा १५ लाख ७५ हजार ३०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. जिल्हा सहायक पुरवठा अधिकारी संदीप शिंदे यांच्या तक्रारीवरून जिन्सीत गुन्हा नोंद झाला.

Black-marketing
लोक आदर्श पतसंस्थेत 6 कोटींचा घोटाळा; अध्यक्ष पठाणसह 11 जणांवर गुन्हा दाखल

वाळूजला प्रक्रिया अन् गुजरातला विक्री

ही टोळी रेशनचा तांदूळ गोळा करून वाळूजच्या एका गोदामात धुवून त्यावर प्रक्रिया करायचे. त्यानंतर हाच तांदूळ आकर्षक नव्या पॅकिंगमध्ये भरून गुजरातच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवायचे.

असा चालायचा गोरखधंदा

काळ्याबाजारात वळवण्यासाठी रेशन दुकानदारांकडून लाभार्थीना या महिन्यात शासनाकडूनच रेशन कमी आल्याचे सांगून नियमापेक्षा कमी वाटप केले जायचे. त्यानंतर उरलेले गोळा करून काळ्याबाजारात विकले जायचे. ही टोळी रिक्षातून गल्लोगल्ली फिरून अंत्योदय योजनेचे धान्य पैशाच्या मोबदल्यात विकत घ्यायचे. तसेच पालकांकडून अंगणवाडीतून मिळणारा पोषण आहार घेऊन त्याबदल्यात रेशनचे धान्य दिले जायचे. ही पाकिटे फोडून हा माल दुसऱ्या गोण्यांमध्ये भरून चिवडा बनवणाऱ्या व्यापाऱ्यांना विकला जात होता.

चिमुकल्यांच्या घासावरही डल्ला

६ महिने ते ३ वर्षांची बालके, तसेच गरोदर व स्तनदा मातांना घरपोच दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची शासनाची पाकिटे फोडून तो माल दुसऱ्या गोण्यांत (पल्टी करून) भरला जात होता. यात तूर, मुगडाळ खिचडी प्रीमिक्सच्या २३ गोण्या (५० किलो) आणि मल्टी मिक्स सिरियल्स अँड प्रोटिन्स प्रिमिक्सच्या १८ गोण्या (५० किलो) असा १ लाख ३१ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बाल विकास अधिकारी गणेश पुंगळे यांच्या फिर्यादीवरून जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

logo
Pudhari News
pudhari.news