

BJP Leader Ganesh Temkar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगापूरमधील नरवाडी शिवारात BJP युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि भालगाव येथील रहिवासी गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, टेमकर यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत सापडला.
ग्रामपंचायत सरपंच आसिफ पटेल आणि स्थानिक कार्यकर्ते गौरव विधाटे हे हदियाबाद–नरवाडी मार्गावरून जात असताना त्यांना विचित्र वास आला. त्यांना शंका आल्याने त्यांनी जागा तपासली असता झुडपात एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. त्वरित त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलावून टेमकर यांना वाहनाने गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेला.
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करताच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर घटनास्थळावरून मिळालेल्या कागदपत्रांवरून मृताची ओळख गणेश टेमकर अशी करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमारसिंह राठोड आणि त्यांची टीम तातडीने घटनास्थळी पोहचली. पंचनामा करण्यात आला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस तपास अधिकृतपणे सुरू करण्यात आला आहे. सध्या मृत्यूचे कारण स्पष्ट नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरेल.
टेमकर यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर आणि स्थानिक गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. गणेश टेमकर हे युवा मोर्चात सक्रिय असल्याने त्यांच्या अचानक मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, गणेश टेमकर हे मागील दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. टेमकर बेपत्ता असल्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्यांचा शोध घेत होते. गावात, परिसरातील रस्त्यांवर, ओळखीच्या ठिकाणी आणि मित्रांच्या घरीही शोधमोहीम राबवण्यात आली होती, परंतु त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता. या पार्श्वभूमीवर त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी नातेवाईकांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच टेमकर यांच्या हालचाली, शेवटचे लोकेशन, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि CCTV फुटेजचा देखील तपास केला जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.