

BJP Lays Claim to Chhatrapati Sambhajinagar-Jalna Constituency
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक भाजपचेच निवडून आले आहेत. त्यामुळे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा भाजपकडे घ्यावा, असे पत्र शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठविले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या या मतदारसंघावर भाजपकडून दावा केला जात असल्याने पुन्हा एकदा दोन्ही मित्र पक्षात वाद चिघळण्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजपच्या युतीवेळीच दोन्ही पक्षांकडून जागा वाटपाचा फार्म्युला निश्चित करण्यात आला होता. परंतु, मागील सहा वर्षांतील राजकीय उलथापालथीमध्ये शिवसेनेचे विभाजन होऊन शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबतचा फार्म्युलाही आता इतिहासजमा झाला आहे.
तसेच जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिव सेनेपेक्षा भाजप सर्वाधिक जागांवर विजय मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. या ताकदीच्या जोरावरच आता भाजपने शिंदे सेनेकडे असलेल्या मतदारसंघांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची नुकतीच घोषणा झाली आहे. या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवक, सदस्यांनाच मतदानाचा अधिकार असतो. सुमारे ६०० मतदारसंघ असून, त्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात भाजपचेच सर्वाधिक मतदार असल्याने भाजप शहर जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी हा मतदारसंघ भाजपसाठी सोडून घ्यावा, अशी मागणी प्रदे-शाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे या मागणीवरून आता दोन्ही मित्र पक्षात पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता आहे.