

Complaints raised at Shiv Sena meeting
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी छत्रपती संभाजीनगर आणि जालना लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगरातील काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्यांविषयी तक्रारींचा पाढा वाचला. काहींनी आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याची खंत व्यक्त केली. तर काहींनी नेत्यांच्या सांगण्यावरुन निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याविरोधात काम केल्याची तक्रार केली. त्यावर आरोपांची सत्यता तपासण्यासाठी समिती पाठवा, असे म्हणत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी हे आरोप फेटाळून लावले.
शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर शिवसेना नेत्यांकडून पक्ष विस्ताराला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिव-सेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ग्रामीण महाराष्ट्राचा दौरा रविवारपासून सुरू झाला. पहिल्या टप्प्यात खासदार डॉ. शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील ३०० पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीला मंत्री पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, हिकमत उढाण, संजना जाधव, रमेश बोरणारे, विलास भुमरे, प्रदीप जैस्वाल, संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, प्रकाश महाजन व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पदाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ हनुमान भोंडवे तसेच इतर काही जणांनी स्थानिक नेत्यांविर- ोधात तक्रारींचा सूर लावल्याचे समजते. मनपा निवडणुकीत माझ्याविरोधात आपल्याच लोकांनी पॅनल उतरविले होते, अशी तक्रार जंजाळ यांनी केली. भोंडवे यांनीही नेत्यांवर नार- ाजी दर्शविली.
आपल्या नेत्यांच्या सांगण्यावरून माझ्याविर- ोधात आपल्याच कार्यकर्त्यांनी काम केले असे ते म्हणाले. याशिवाय इतर काही जणांनी आपल्याला निधी मिळत नाही, शिवाय विकासकामांच्या उद्घाटनांना बोलाविले जात नाही, अशी तक्रार केली. एका महिला पदाधिकार्यानेही तक्रारींचा सूर लावला. त्यावर खासदार संदीपान भुमरे यांनी एकदा सगळ्या आमदार, जिल्हाप्रमुखांची बैठक होऊनच जाऊ द्या, त्यात सगळे स्पष्ट होईल, असे नमूद केले.
पश्चिममुळे इभ्रत वाचली
महापालिका निवडणुकीत शिवसेनेला केवळ १३ जागा मिळाल्या. त्यापैकी ९ नगरसेवक हे एकट्या पश्चिम मतदारसंघातून निवडून आले. पश्चिममुळे आपल्या पक्षाची इभ्रत वाचली, असे सांगत पश्चिम मतदारसंघात पक्षाची कामगिरी उत्तम असल्याचे शहरप्रमुख विजय वाघचौरे यांनी नमूद केले.
विषय मुंबईपर्यंत कशाला येऊ देता ?
मीही एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. तिथेही तक्रारी येतात, परंतु आम्ही त्या तिथेच निकाली काढतो. उगाच विषय मुंबईपर्यंत कशाला येऊ देता. सगळीकडे आपलीच सत्ता आहे. त्यामुळे स्थानिक विषय इथेच संपवत चला, असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला.