

बिडकीन :बिडकीन पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत चोरीचा संशय असलेला सुमारे ५० किलो वजनाचा अॅल्युमिनियम तारा विक्रीसाठी घेऊन फिरणाऱ्या तिघांसह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दोन दुचाकींसह एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत नितेश विजय आडे (२१), रोहित विलास चव्हाण (१९), सावन सदू चव्हाण (२०) तसेच एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपी वरवंडी तांडा (ता. पैठण) येथील रहिवासी आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.१६) दुपारी साडेतीनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-बिडकीन मार्गावरील म्हरोळा शिवारातील कन्हैया धर्मकाट्याजवळ काही जण संशयास्पदरीत्या अॅल्युमिनियम तारेचा माल विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींकडे असलेल्या मालाबाबत कोणतेही खरेदी-विक्रीचे बिल अथवा मालकी हक्काचे कागदपत्र आढळून आले नाही. तसेच मालाच्या मालकीबाबत समाधानकारक माहिती देण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे पोलिसांनी संशयित माल जप्त करून गुन्हा नोंदविला.
कारवाईदरम्यान ५० किलो वजनाचे अॅल्युमिनियम तारेचे सात बंडल आणि दोन दुचाकी असा एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार अशोक बन्सीधर सोकटकर यांनी फिर्याद दिली आहे.
या मोहिमेत सहाय्यक फौजदार अशोक सोकटकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल माळी, वाल्मिक निकम, पोलिस अंमलदार ढवळे, पोलिस हवालदार हनुमान धनवे आणि पोलिस हवालदार मगर यांनी सहभाग घेतला.