

Bidkin a motorcyclist was seriously injured due to a kite's nylon manja
बिडकीन, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर येथून सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास गावी परतत असताना, बिडकीन येथील एस. बी. शाळेसमोर चालत्या दुचाकीवर मांजा अडकून ओढला गेला. काही क्षणातच हा मांजा थेट चेहरा, नाक व डोळ्यांवर घासला गेल्याने दुचाकीस्वार हारून बशीर शेख (४०, रा. बिडकीन) हे गंभीर जखमी झाले.
सध्या संपूर्ण जिल्ह्यात नायलॉन व चायनीज मांजामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने दुचाकीस्वार व पादचाऱ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. बिडकीन येथेही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.या अपघातात त्यांच्या चेहऱ्यावर, नाकावर, डोळ्यांवर व गालांवर खोल जखमा झाल्या असून, तातडीने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. संपूर्ण चेहऱ्यावर टाके द्यावे लागले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत बिडकीन पोलिस ठाण्याच्या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक दिनेश शेळके यांना विचारणा केली असता, घातक नायलॉन व चायनीज मांजाच्या खरेदी-विक्रीवर बंदी असून, मागील १५ दिवसांपासून समाजमाध्यमांसह नागरिकांना सातत्याने सूचना व आवाहन करण्यात येत आहे.
चेहऱ्यावर ४० टाके
दुचाकीस्वार हारून शेख मांजामुळे गंभीर जखमी झाले आहेत. नाकाला, डोळ्याच्या खाली, कानाला, गालावर अशा संपूर्ण चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने तब्बल चाळीस टाके लागल्यान सागण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी बिडकीन येथील दहा दुकानदारांना नोटीस बजावल्या असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश शेळके यांनी सांगितले.