

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बोगस डॉक्टरसंदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी औरंगाबाद खंडपीठाचे. न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. वैशाली पाटील-जाधव यांनी नॅशनल मेडिकल कमिशनचे चेअरमन यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. त्यांना २७ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करावयाचे आहे.
विधी शाखेचा विद्यार्थी स्वप्नील गरड (रा. नेवासा ता. सौंदला) याने दाखल केलेल्या याचिकेत. डॉक्टर अविनाश काळे यांनी बेलारुस रशियन येथून जनरल मेडिसीन विषयात पदविका पूर्ण केल्याबाबत याचिकाकर्त्याने प्रश्न उपस्थित केला आहे. याचिकाकर्त्याने माहिती अधिकार ाखाली केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने मेडिकल कमिशनमधील रेकॉर्डनुसार संबंधितांची डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे नोंदणीच नाही.
वरील कार्यालयाच्या संकेतस्थळावरून प्राप्त माहितीनुसार संबंधित डॉक्टरच्या नोंदणी क्रमांकावर दुसऱ्याच डॉक्टरची नोंदणी आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळे याचिकाकर्त्याला खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांनी दिल्याचा जबाब याचिकाकर्त्याने पोलिस अधीक्षकांना दिल्याचे याचिकेत म्हटले आहे.
याचिकाकर्त्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह विविध उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही यावर कारवाई झाली नाही, म्हणून त्यांनी अॅड. नवीन शहा यांच्यातर्फे खंडपीठात याचिका दाखल केली आहे.