

The Dean took a surprise review of night hospital services in the Ghati
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गोरगरीब रुग्णांसाठी आधार असलेल्या घाटीतील रात्रीच्या रुग्णसेवेचा अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी शनिवारी (दि.१८) मध्यरात्री अचानक भेट देत आढावा घेतला. सर्जिकल इमारतीमधील विविध विभागांमधील आपात्कालीन सेवा सुविधांसह औषधीची उपलब्धता जाणून घेतली. धर्मशाळेचीही पाहणी केली. तिथे अस्वच्छतागृहात अस्वच्छता आणि लाईट नसल्याने त्याबाबत कारवाईच्या कडक सूचना अधिष्ठातांनी दिल्या. तसेच रुग्णांशी संवाद साधत तब्येतीची आणि मिळणाऱ्या उपचारसेवा बाबतची विचार पूस केली. यावर रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
मागील दीड वर्षापासून घाटीतील रुग्णसेवेत आमूलाग्र बदल झाला आहे. अद्ययावत यंत्रसामग्रीसह उपचारसेवेतील तत्परतेमुळे रुग्णांचीही गर्दी वाढत आहे. विविध वॉर्डामध्येही शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल असतात. या रुग्णांना मिळणाऱ्या आवश्यक सेवासुविधांचा अधिष्ठाता डॉ. सुक्रे हे वेळोवेळी आढावा घेत असतात. शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजता त्यांनी अचानक भेट देत घाटीतील रुग्णसेवेची प्रत्यक्ष पाहणी केली.
सर्जिकल इमारतीमधील अपघात विभाग, प्रसूती कक्ष, एनआयसीयू, पीआयसीयू, एक्स रे व सोनोग्राफी विभाग, बाह्यपरिसर, वैद्यकीय अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन रात्रीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या आपत्कालीन सेवा सुविधा आणि औषधांची उपलब्धता तसेच पार्किंग या सर्व सुविधांचा आढावा घेतला. यावेळी रात्रीचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अन्सारी व सुरक्षारक्षक यांना निर्देश दिले. रात्री २.१५ वाजेपर्यंत रुग्णसुविधांची पाहणी सुरू होती.