

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाणीटंचाईची स्थिती अधिक गंभीर होत असून, टंचाईग्रस्त गावांच्या संख्येतही झपाट्याने वाढत आहे. अवघ्या महिनाभरात विभागात ३७० टँकर वाढले आहेत. सध्या विभागातील ५ जिल्ह्यांतील ४५० गावे आणि २८४ वाड्यांना ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे हिंगोली, नांदेड आणि लातूर हे जिल्हे अद्याप टँकरमुक्त आहेत. मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहिले आहे.
जून, जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. परंतु, आऑगस्ट, सप्टेंबर ही दोन महिने पावसाचा खंडकाळ अधिक राहिला. त्यामुळे ऐन हाततोंडाशी आलेले पीक हातून गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात पाणी टंचाईमुळे आता विविध गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन हिवाळ्यातच विभागातील विविध गावांमधून टँकरद्वारे पिण्याच्या पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
२० ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यातील २५५ गावे आणि १८२ वाड्यांना ४४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांतच विभागात टंचाईच्या झळा अधिक तिव्र झाल्याने २६५ टैंकर वाढले आहेत. १६ नोव्हेंबरच्या अहवालानुसार, विभागातील पाच जिल्ह्यांतील ४५० गावे आणि २८४ वाड्यामध्ये ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तीन आठवड्यात केवळ टँकरचीच संख्या नव्हे तर गावांची संख्या १९५ व वाड्यांची संख्या १०२ ने वाढली आहे.
खासगी विहिरींचे अधिग्रहण
पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने पर्यायी जलस्रोत उपलब्ध करण्यासाठी खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. हिंगोली वगळता विभागातील इतर सातही जिल्ह्यांमध्ये १,२३८ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. यात संभाजीनगर ८६, जालना १२२, परभणी २७, नांदेड १, बीड २४२, लातूर ३८० आणि धाराशिव ३८० विहिरींचा समावेश आहे.