

Chhatrapati Sambhajinagar Bus Accident
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर शनिवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. बस २० फूट खोल नाल्यात कोसळली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या ट्रॅव्हल्समध्ये एकुण २६ प्रवासी होते.
अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी पहाटेच्या वेळी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून आत अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्समध्ये १४ पुरुष, ९ महिला आणि २ लहान मुले असे २६ प्रवासी होते. त्यापैकी एका पुरुष प्रवाशाचा मृत्यू झाला असून एक पुरुष प्रवासी गंभीर जखमी आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर-जालना हा मुख्य रहदारीचा मार्ग असल्याने अपघातस्थळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू करून वाहनांना पर्यायी मार्गाने वळवले. दोन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स नाल्यातून बाहेर काढण्यात आली.
विशेष म्हणजे, पोलिसांनी स्वतः रस्त्यावर उतरून विखुरलेला कचरा आणि तुटलेल्या कठड्याचा मलबा बाजूला केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.