

Ban on drawing water from Jayakwadi; farmers turn aggressive
पाचोड, पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी धरणाच्या पाण्यावर परजिल्ह्यांतील शेती आणि कारखानदारी बहरत असताना धरण ज्या पैठण तालुक्यात उभारले, त्याच तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी घेण्यापासून रोखले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. शनिवारी (दि. १४) डाव्या कालव्यातून पाणी उपसा करण्यास मज्जाव करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या पथकाला शेतकऱ्यांनी घेराव घालत जाब विचारला. परवानगीशिवाय पाणी घेतल्यास कारवाईच्या इशाऱ्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हासे आणि उपविभागीय अधिकारी पुरुषोत्तम सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत पाणी उपशावर कारवाई करण्यासाठी शनिवारी विशेष पथक तैनात करण्यात आले होते. शाखाधिकारी मृणाल मुरळ पाटील, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संभाजी सोळुंके, कालवा निरीक्षक प्रभाकर तांगडे, शिवाजी दुबाले, किरण भुकेले, संजय सानप, विठ्ठल पोकळे, राजू गाभूड, रामदास रोडगे, अशोक मस्के, संतोष सोनवणे, राहुल आव्हाड आदींचा या पथकात समावेश होता.
हे पथक पैठण तालुक्यातील आखातवाडा, सालवडगाव, ब्रह्मगाव, हिंगणी आणि विहामांडवा शिवारात पोहोचले. कालव्यातून ट्रॅक्टरद्वारे पाणी घेण्यास मज्जाव करण्यासह परवाना नसलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली. यामुळे आधीच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. या प्रश्नावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून स्थानिक शेतकऱ्यांवरील पाणी उपशाचे निर्बंध दूर करावेत, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा हक्काच्या पाण्यासाठी मुख्य अभियंता कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
यावेळी हबीबखान पठाण, सिद्धू भांड, डॉ. बाबासाहेब गोजरे, कृष्णा चावरे, प्रभाकर सुकासे, संजय आरगडे, बंडू दिवटे, कृष्णा रोडगे, माऊली हाकम, परसराम हजारे, राजू हजारे, गोविंद गोजरे, कृष्णा आरगडे, रामनाथ कोरडे, शाहदेव सुराशे, गणेश कमळे, राधाकिसन ठोंबरे, पंढरीनाथ ठोंबरे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
धरण आमच्या तालुक्यात, मग पाणी घेण्यास अडवणूक का ?
पैठणच्या डाव्या आणि उजव्या कालव्यासाठी रब्बी हंगामात प्रत्येकी तीन, तर उन्हाळी हंगामात प्रत्येकी एक आवर्तन प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी रब्बी हंगामात १७.४८ टीएमसी, तर उन्हाळ्यात ४.५९ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. त्यानुसार १२ नोव्हेंबरपासून कालव्यात पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी मोटारी सुरू करून सिंचनाला सुरुवात केली होती. मात्र, पाणी उपसा रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाचे पथक आल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. धरण आमच्या तालुक्यात बांधले, त्यासाठी जमिनी आमच्या गेल्या आणि विस्थापिताचे चटकेही आम्ही सोसले. मग आमच्याच शेतीसाठी पाणी घेताना अडवणूक का? असा सवाल शेतकऱ्यांनी केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन परिस्थिती पाहावी, असा टोलाही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना लगावला.
...तर गुन्हे दाखल करणार
पाण्याचे परवाने देणे बंद असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय पाणी उपसा केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. यावर 'परवाना शुल्क भरण्यास आम्ही तयार असताना परवाने देणे बंद का?' असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. जायकवाडीच्या २०८ किलोमीटर लांबीच्या डाव्या आणि १३२ किलोमीटरच्या उजव्या कालव्याद्वारे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील मोठ्या क्षेत्राला सिंचनासाठी पाणी मिळते. मात्र, धरणासाठी जमिनी देणाऱ्या पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनाच पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली