

Birsa Munda’s ideas should reach the new generation: Khambayate
कन्नड, पुढारी वृत्तसेवा भगवान बिरसा मुंडा यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि स्वाभिमानाचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी केले आहे.
धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील अंबाला या आदिवासी गावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विशेष दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांसोबत हा दीपोत्सव उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त रविवार रोजी जनजातीय गौरव दिन साजरा होत आहे.
यानिमित्त अंबाला येथे भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा दिव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली. दीपोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, त्याग, संघर्ष आणि सांस्कृतिक परंपरेला अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या मंजुषा मलदोडे, अरुण थोरात, साहेबराव तावरे, पवन खंडेलवाल, धोंडीराम गांगड, गंगाराम आगीवले, सखाराम भुतांबरे, कचरू आवाले, प्रकाश गावौडे, सुरेश गावंडे, देवराव मधे, हौशाबाई उघडे, सुनबाई गांगड, काळुबाई उघडे, तुळसाबाई आगीवले, सुंदराबाई सीद, सुदाम पवार, शशिकांत नागरे, दिनकर दाभाडे, महेश मलदुडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.