

Two brothers died on the same day; a pall of gloom descends on Fardapur!
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. १४) घडली. शेख अब्दुल रहीम शेख अब्दुल रशीद आणि शेख हमीद शेख अब्दुल रशीद अशी मृत भावांची नावे आहेत. विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे धाकटे बंधू शेख मुक्तार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच पुन्हा दोन भावांचा मृत्यू झाल्याने फर्दापूरवर शोककळा पसरली आहे.
शेख अब्दुल रहीम हे अजिंठा लेणी परिसरात पर्यटन व्यवसायाशी संबंधित होते. औपचारिक शिक्षण घेतलेले नसतानाही देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या संपर्कातून त्यांनी तब्बल १४ देशांच्या भाषा आत्मसात केल्या होत्या. जपानी, कोरियन, फ्रेंच आणि इंग्रजीसह विविध भाषांमध्ये पर्यटकांशी संवाद साधण्याचे कौशल्य त्यांनी मिळवले होते. त्यामुळे ते परिसरात 'रहीम गाईड' म्हणून परिचित होते. जिद्द आणि अनुभवाच्या जोरावर मिळवलेल्या त्यांच्या भाषाज्ञानाचे अनेकांना कौतुक वाटत असे.
एकाच कुटुंबातील दोन भावांचा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू झाल्याने नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. दोन महिन्यांत तीन भावांचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनमिळावू स्वभावाचे असलेले गाईडशेख अब्दुल रहीम यांच्या निधनाच्या बातमीने अजिंठा येथील लेणी येथील अनेक गाईडने दुःख व्यक्त केले.
शनिवारी सायंकाळी फर्दापूर येथील मुस्लिम कब्रस्तानात दोन्ही भावांचा दफनविधी करण्यात आला. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेने फर्दापूरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भावाच्या निधनाच्या बातमीने बसला धक्का
शनिवारी सकाळी शेख अब्दुल रहीम यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भावाच्या निधनाची बातमी समजताच शेख हमीद यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचाही मृत्यू झाला.