

Attempted kidnapping of 'that' little girl for ransom of Rs 1.5 crore
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शिकवणीसाठी गेलेल्या दहा वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न कार चालक, नागरिक आणि मुलीच्या प्रसंगावधानामुळे उधळल्या गेला. अख्खे पोलिस दल रस्त्यावर उतरले आणि रात्रीतून दोन अपहरणकत्र्यांना बेड्या ठोकल्या.
चिमुकलीच्या आजोबाकडून दीड कोटी रुपयांची खंडणी उकळण्यासाठी अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले आहे. संदीप ऊर्फ पप्पू साहेबराव पवार (३२, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना) आणि बाबासाहेब अशोक मोरे (४२, रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुरुवारी (दि.१७) दिली. तर दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले.
औरंगपुरा भागात आजोबांकडे राहणारी १० वर्षीय मुलगी गारखेडा येथील शिकवणीहून परत येत असताना चौर अप-हरणकर्त्यांनी तिला सेंट्रो कारमध्ये ओढून अपहरण केले. चालक नवनाथ चेडेने प्रतिकार केला, त्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. तरीही त्याने पाठलाग सुरू ठेवला. शिवाजीनगरजवळ मुलीने हुशारीने अपहरणकत्र्यांना पोलिसांचा १०० नंबर दिला.
नागरिकांनी वाईन शॉपजवळ कारवर दगडफेक केली. घाबरून आरोपींनी मुलीला सोडले आणि साराराजनगर येथे कार सोडून पळ काढला. सदर सेंट्रो कारचा क्रमांक बनावट (एमएच-२०-बीएन-२३००) असून, खरी नोंदणी (एमएच-२०-बीएन-२३९९) आहे. पोलिसांनी इंजिन व चेसिस नंबरवरून मूळ मालकाचा शोध घेऊन जामखेड विठ्ठलवाडीतील गणेश मोरेपर्यंत धागेदोरे पोहोचवले. गुन्हे शाखा, सायबर, पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासह झोन-२ मधील डीबी पथकांना पोलिस आयुक्तांनी कामाला लावले होते. घटनास्थळी सोडलेली कार, सापडलेल्या नंबर प्लेट, सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक तपास करत आरोपी निष्पन्न केले. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाने बाबासाहेब मोरे आणि संदीप पवारला अंबड-पाचोड रस्त्यावरील पिंपरखेड येथील हॉटेल लोकसेवा येथे जेवण करीत बसलेले असतानाच रात्रीतून उचलले.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त प्रशांत स्वामी, रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, कृष्णा शिंदे, शिवचरण पांढरे, सहायक निरीक्षक विनायक शेळके, रविकांत गच्चे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, नवनाथ पाटवदकर, विशाल बोडके, प्रविण वाघ यांच्या पथकांनी मोरे आणि पवारला पुंडलिकनगर ठाण्यात आणण्यात आले. गुरुवारी सकाळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः ठाण्यात जाऊन दोघांची कसून चौकशी केली. त्यात खंडणीसाठी अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. संवेदनशील घटना असल्याने पोलिस आयुक्त सुमारे तीन तास पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. ४ फेब्रुवारीला चैतन्य तुपे या मुलाचे अपहरण झाल्यानंतर शहर पोलिसांनी सर्व ताकत पणाला लावून १२ तासांत सुखरूप सुटका केली होती. त्यानंतर दहा वर्षीय मुलीच्या अपहरण थरारानंतर काही तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या. दोन्ही गुन्ह्यांत जालना जिल्ह्यातील आरोपी असलयाचे समोर आले आहे.
अपहरणाचा मास्टरमाईंड हा गणेश मोरे असून, तो एका पतसंस्थेत मॅनेजर म्हणून काम करतो. त्याच्यासह बळीराम महाजन (दोघे रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) हे फरार झाले असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. विशेष म्हणजे चारही आरोपी आणि चिमुकलीचे आजोबा हे एकाच गावचे असून, ओळखीचे असल्याचेही समोर आले आहे. तिच्या आजोबाची गावात मोठी शेती आणि घर आहे. नेहमी जाणे-येणे असल्याने सर्व जण त्यांना ओळखतात. तर चालक नवनाथही त्याच गावाचा रहिवासी आहे.
मास्टरमाईंड गणेश मोरे याने दीड महिन्यापूर्वी जुनी सेंट्रो कार विकत घेतली होती. त्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी अपहरण करण्यासाठी काका बाबासाहेब मोरे आणि अन्य दोघांना कटात सामील करून घेतले. काही दिवसांपूर्वी खराडी, पुणे येथेही चौघांनी मिळून अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तोही फसला होता, असे तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्यांनी या चिमुकलीच्या आजोबाकडे मोठी संपत्ती असल्याने तिच्या अपहरणाचा प्लॅन केला. गणेशने १५ दिवस रेकी केली. त्यानंतर शिकवणीच्या ठिकाणाहून अपहरण करण्याचे ठरले. बुधवारी चौघांनी प्रयत्न केला, मात्र तोही उधळल्या गेला. यात दोघे गजाआड झाले. आता गणेश मोरे आणि बळीराम महाजनच्या हाती बेड्या पडणे बाकी आहे.
आरोपी बाबासाहेबचा मोरेचा गणेश सख्खा पुतण्या आहे. त्याच्या मोबाईलच्या तपासणीत त्याने गणेशसोबत अनेक दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर कॉलिंगवर बोलणे झाल्याचे समोर आले. तसेच चिमुकलीचा कारचालक नवनाथ चेडे हाही त्याच गावाचा असल्याने आर-ोपींना ओळखतो. बाबासाहेब मोरेने काही दिवसांपूर्वी नवनाथला कॉल करून हालहवाल विचारात काही काम असेल तर सांग, असे म्हटले होते.