

Dangerous transportation of passengers by auto-rickshaw drivers at the railway station.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेस्थानकावरील रिक्षा चालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत असल्याने अक्षरशः कोंबून प्रवाशांना बसवत आहेत. दरम्यान हे सर्व रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या समोरच घडत असूनही ते बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रवाशांना नाविलाजाने अनेक अडचणींचा सामना करत घर जवळ करावे लागत आहे.
रेल्वे येताच प्रवाशांना रिक्षाचालकांच्या गराड्याचा सामना करावा लागतो. एवढेच नाही तर विविध ठिकाणी जाण्यासाठी शेअर रिक्षात बसल्यास त्या रिक्षा चार ते सहा प्रवासी कोंबून बसवत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन बसावे लागते. जास्त प्रवासी घेऊ नका असे सांगितल्यास रिक्षाचालकांकडून प्रवाशांकडे जास्त पैशाची मागणी केली जाते. ऐनवेळी रिक्षाची शोधशोध करूनही सर्वत्र तीच परिस्थिती असल्याने आहे त्या परिस्थितीत घर जवळ करण्याच्या विचाराने प्रवासी अडचणीचा सामना करत आहे त्याच रिक्षाने जातात.
अपघाताला निमंत्रण
क्षमतेपेक्षा जास्त प्रवास वाहून नेणे हे नियमांनुसार चुकीचे आहे. दरम्यान ही सर्व कृती रिक्षाचालक रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलांच्या समोरच करत असतांनाही त्यांना कोणी टोकत नसल्याने रिक्षाचालकांची दांडगाई दिवसेंदिवस वाढत आहे.
रिक्षाचालक आपल्या दोन्ही बाजूने प्रवासी बसवून ते थेट राँगसाईड रिक्षा दामटत असल्याने अपघाताची शक्यता दाट आहे. प्रवाशांना पर्याय नसल्याने ते अशा धोकादायक रिक्षांतून प्रवास करण्यास तयार होत आहेत. यांच्यावर वेळीच कारवाई केली तर अशी धोकादायक प्रवासी वाहतूक होणार नाही. अशा रिक्षाचालकांवर वेळीच कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.